। कोलाड | विश्वास निकम ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड गावाच्या हद्दीत रेल्वे मार्गावर एका अज्ञात व्यक्तीने मच्छगंधा एक्सप्रेससमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड येथील अप रेल्वे लाईनवरील कि.मी. क्रमांक 10.25 ते 10.21 दरम्यान सकाळी7.37 वाजण्याच्या सुमारास रेल्वे गाडी क्रमांक 12620 मच्छगंधा एक्सप्रेससमोर एका अज्ञात व्यक्तीने उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत इसम अंदाजे 40 ते 45 वर्षे वयोगटातील असून, त्याचा रंग सावळा आहे. त्याने लहान चौकटीचा शर्ट व फिकट रंगाची पॅन्ट परिधान केली होती. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फर्णे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन. एस. पाटील, पोसई महाडिक व सहकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.







