| पनवेल । वार्ताहर ।
आजारपणाला कंटाळलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. रमेशकुमार बालकृष्णन इल्लन (वय 69) असे त्यांचे नाव असून बहिणीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.
पनवेलमध्ये राहणारे रमेशकुमार इल्लन हे मागील काही वर्षांपासून आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांनी अनेक उपचार केले; मात्र त्यांचा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे आजारपणाला ते कंटाळले होते. रमेशकुमार हे खारघर सेक्टर-35 डी मधील गोकुळधाम सोसायटीत 13 व्या मजल्यावर राहणार्या बहिणीकडे तिच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. 27) आले होते. रात्री ते बहिणीच्या घरी थांबल्यानंतर शुक्रवारी (ता. 28) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांनी सदर इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. खारघर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.