| महाड | प्रतिनिधी |
दारुड्या बापाने आपल्या मुलीला शिवीगाळ केल्यामुळे एका बावीस वर्षीय तरुणीने दि. 19 मार्च रोजी विष प्राशन केले होते. वडील हे मुलीची आई व मुलगी यांना सतत शिवीगाळ करीत असत. सिद्धीका संदीप चव्हाण असे मृत झालेल्या तरुणीचे नाव असून, तिला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिला प्राथमिक उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. परंतु, सिद्धीका हिची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे तिला अधिक उपचाराकरिता मुंबई येथील जे जे रुग्णालय येथे पाठविण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्यामुळे सिद्धीका हिने 22 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला.
वडील दारू पिऊन सतत शिवीगाळ करीत होते, त्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून मी उंदराचे (रेक्टोल) औषध प्यायली आहे, असे सिद्धीकाने मृत्यूपूर्वी जबाब दिला आहे. 29 मार्च रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार आर.के. गोरेगावकर हे करीत आहेत