। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील एक तरुण हॉटेल व्यावसायिक म्हणून नावारूपाला आलेल्या दिनेश जगे यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.5) सकाळी घडली. दिनेश मनोहर जगे यांनी (वय 47, रा. ध्रुव सोसायटी, विद्यानगर) आपल्या राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला रस्सी बांधून आत्महत्या केली.
कोरोना काळातील व्यवसायातील मंदीमुळे कर्जबाजारी झालेल्या दिनेशने आयुष्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. विद्यानगर येथील घरातील बेडरूममध्ये बराच वेळ दिनेश दरवाजा उघडत नसल्याने त्याचा भाऊ निलेश जगे याने बेडरूममध्ये प्रवेश केला असता दिनेश पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला त्वरित खाली उतरवून पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलिस नाईक एस.एस. खीचडे करीत आहेत. अलिबागमध्ये हॉटेल व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिनेश जगे यांच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्याने हॉटेल व्यवसायात चांगला जम बसवला होता. अलीकडेच त्याने नागाव येथे हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. मात्र लॉकडाऊनमुळे पर्यटक येत नसल्याने त्याचे नुकसान होत होते. त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकले होते. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र अधिकृतरित्या त्याच्या आत्महत्येचे कारण कळले नाही.