विळे येथील समर्थ कृपा हॉटेलमध्ये तरुणाची आत्महत्या

। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव तालुक्यातील विळे नाका येथील समर्थ कृपा मातोश्री हॉटेलमध्ये एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.10) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मंगेश नंदू काळभोर (वय-36, मूळ रा.तुगारली जि.पुणे सध्या रा.कासार आळी, सुधागड) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

दत्ता मारुती बाबर (वय 20, रा.वावळोली ता.सुधागड) याने तो काम करीत असलेल्या माणगाव तालुक्यातील विळे नाका येथील समर्थ कृपा मातोश्री हॉटेलमध्ये ब्लँकेट लोखंडी पाईपला बांधून गळफास घेत आत्महत्या केली.स्थानिकांनी त्याला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालय माणगाव नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे खरे कारण समजलेले नसून घटनेची माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे यांनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे हे करीत आहेत.

Exit mobile version