। नेरळ । प्रतिनिधी ।
अनेक पर्यटक माथेरानमध्ये पर्यटनासाठी येत असतात. त्यातील मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे मद्यधुंद अवस्थेत असतात. अशाच मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने एको पॉईंटवर टोकावर जाऊन आत्महत्या करण्याचे नाटक केले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. अखेर पोलिसांनी त्याची नौटंकी थांबवून त्याची घरी रवानगी केली.

एको पॉईंट या गजबजलेल्या प्रेक्षणीय स्थळावर दिवा येथे राहणार्या युवकाने मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचा बनाव केला. दरीच्या टोकावर जाऊन तो बसला होता. त्याला शिताफीने रेस्क्यू टीमच्या सहकार्याने पोलिसांनी सुखरूप काढले. तो युवक एको आणि कींग एडवर्ड या दोन्ही पॉईंटच्या मधोमध असलेल्या 1500 फुट खोल दरीच्या टोकावर जाऊन बसला असल्याचे येथील व्यावसायिक व उपस्थित पर्यटकांच्या निदर्शनात आले. यावेळी युवकाला समजावुन रेलींगच्या आत येण्याची विनवणी केली. मात्र हा तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. येथील स्थानिक व्यवसायिकांनी त्या घटनेची माहिती माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांना दिली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता माथेरान पोलिसांनी सह्याद्री रेस्क्यू टिम सोबत घटनास्थळ गाठले.
यावेळी माथेरान पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राहुल पाटील तसेच रेस्क्यू टिमचे संतोष केळगणे यांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाशी सलोख्याने बोलत दरीच्या टोकावरून सुरक्षा रेलींगच्या आत घेतले. यानंतर त्या युवकाला माथेरान पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलीस हवालदार महेंद्र राठोड, पोलीस शिपाई राकेश काळे यांनी चौकशी केली असता त्या युवकासोबत आणखी 8 मित्र असल्याचे समजले. यावेळी सर्व मित्रांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी सोबत असलेले मित्र देखील मद्यधुंद असलेल्या स्थितीत आढळून आले. त्या युवकाला एको पॉईंटवर सोडून बाकीचे मित्र पॉईंट फिरण्यासाठी निघून गेल्याने स्थानिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला होता.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस प्रशासन तसेच रेस्क्यू टीमच्या यंत्रणेची भांबेरी उडाली होती. या प्रकारची डोंबिवली, ठाणे, दिवा येथील फिरण्यासाठी आलेल्या सर्व मद्यधुंद तरुणांना जाणीव करुन देण्यात आली. यावेळी सह्याद्री रेस्क्यु टिमचे सुनील कोळी, चेतन कळंबे, उमेश मोरे, महेश काळे तसेच रुग्णवाहिकेसह अजिंक्य सुतार मदतीला होते.