वाहनचालक, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
। सुकेळी । वार्ताहर ।
मुंबई -गोवा महामार्गाचे काम हे अद्यापपर्यंत पाहिजे तसे पूर्ण झालेले नसून बरेच काम बाकी आहे. यातच पावसाळा सुरू झाल्यामुळे महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. अशातच याच मार्गावरील अपघातासाठी धोकादायक खिंड म्हणून ओळख असलेल्या सुकेळी खिंडीची अवस्था एकदम भयानक झाल्याचे चित्र सद्यपरिस्थितीत पाहावयास मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुकेळी खिंड ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणीची ठरणार आहे. आताच्या परिस्थितीत सुकेळी खिंड ही दरडीच्या सावटाखाली असून संबंधित कंपनीने सुकेळी खिंडीत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खिंडीमधिल जे डोंगर खोदले गेले आहेत त्यामुळे पावसाळयाच्या सुरूवातीलाच सुकेळी खिंडीमध्ये या डोंगरावरुन मोठं मोठे दगडगोटे व माती मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. त्यातच ऐन पावसाच्या दिवसांमध्ये खिंडीमधील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. या ठिकाणी पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरण्याची शक्यता आहे. सुरवातीच्या पहिल्याच पावसातच तासभर पाऊस पडल्यानंतर दरड कोसळण्यास सुरुवात झाली असेल तर पुढील काळात पडणार्या जोरदार पावसात नेमके काय घडेल हे सांगता येत नाही त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.