| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा हायवे राष्ट्रीय महामार्गावरील सुकेळीचा धबधबा पर्यटकांसाठी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आकर्षक ठरत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेली खिंडीच्या पायथ्यापासुन महामार्गाच्या पूर्वेला वरदायनी मंदिराच्या डोंगरावरून झाडा झुडपातून कोसळणाऱ्या या नयनरम्य धबधब्याची माता वरदायनीचा धबधबा म्हणून आहे. परंतु, स्थानिक त्याला सुकेलीचा धबधबा म्हणून ओळखतात.
यावर्षी पाऊस वेळेवर सुरु झाला असुन गेली आठ दिवसापासून जोरदार पावसामुळे हा धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे रविवारची सुट्टी घळविण्यासाठी मुंबई-पुणे ठाणे तसेच स्थानिक निसर्गप्रेमीना या धबधब्याची वर्षासहलीसाठी पार्वणीच ठरत आहे. मुंबई-गोवा महामर्गावरून सुकेली खिंडीच्या पायथ्याजवळून खैरवाडी फाट्यावरून या धबधब्यावर जाण्यासाठी साधारण पणे 30 मिनिटे पायपीट करावी लागते. परंतु निसर्गरम्य व डोंगराच्या कुशीत असणाऱ्या माता वरदायनीच्या मंदिराजवळून येणारा 100 ते 150 फूट उंचावरून पडणारे पाणी हे पर्यटकांसाठी आकर्षक ठरत आहे.







