स्वतःचाच विक्रम मोडत ऐतिहासिक नोंद
। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारी (दि.2) सुमित अंतिलने भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्याने पुरुषांच्या एफ 64 भालाफेक स्पर्धेत हे सुवर्णपदक जिंकले आहे. सुमितचे हे पॅरालिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक आहे. त्याने याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.
याआधी नीरज चोप्राला सलग दोन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकता आली नाहीत याची खंत भारतीयांमध्ये होती. पण सुमितने सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकून आनंद साजरा करण्याची संधी भारतीयांनी दिली आहे. सोमवारी झालेल्या अंतिम फेरीत सुमितने सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच पॅरालिम्पिकमध्ये नवा विक्रमही केला आहे. त्याने 70.59 मीटर लांब भालाफेकत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने यावेळी त्याचाच टोकियो पॅरालिम्पिकमधील 68.55 मीटर लांब भाला फेकीचा विक्रम मोडीत काढला आहे. दरम्यान, सोमवारी श्रीलंकेच्या दुलान कोडिथुवाक्कू याने 67.03 मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या मायकल बुरियनने 64.89 मीटर लांब भाला फेकत कांस्य पदक जिंकले.
दुसर्याच प्रयत्नात ऐतिहासिक कामगिरी
अंतिम फेरीत सुमितने पहिल्या प्रयत्नात 69.11 मीटर लांब भाला फेकत सर्वांना चकीत केले होते. त्यानंतर त्याने दुसर्या प्रयत्नात त्याची कामगिरी आणखी उंचावत नवा विक्रम करत ऐतिहासीक कामगिरी केली आहे. त्याने दुसर्या प्रयत्नात 70.59 मीटर लांब भाला फेकला. हे अंतर त्याला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी पुरेसे ठरले. तिसर्या प्रयत्नात 66.66 मीटर लांब भाला फेकला होता, तर चौथा प्रयत्न अपयशी ठरला. पाचव्या प्रयत्नात त्याने 69.04 लांब भाला फेकला, तर अखेरच्या प्रयत्नात 66.57 मीटर लांब भाला फेकला.
भारताच्या खात्यात 15 पदकांची भर
भारतासाठी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखरा आणि बॅडमिंटनपटू नितेश कुमार यांनी सुवर्णपदक जिंकून दिले आहे. अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले, तर नितेश कुमारने पुरुषांच्या एकेरी एसएल 3 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, आत्तापर्यंत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात 14 पदके जमा झाली असून यामध्ये 3 सुवर्णपदकांसह 5 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे.