बाजारपेठांमध्ये उत्साह, ग्राहकांची गर्दी पूजा साहित्य, मखर,खरेदीची लगबग
। रायगड । प्रतिनिधी ।
बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तयारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यात आगमनाआधीचा शेवटचा आठवडा असल्याने गणेशभक्तांनी हा हक्काचा मुहूर्त साधतबाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे.
मखरांच्या ऑर्डर देण्यापासून ते सजावटीचे सामान खरेदी करणे, पूजासाहित्य, अलंकारासह विविध वस्तूंची खरेदी करण्यात चाकरमानी व्यस्त असल्याचे दिसले. दुकानांपेक्षा रस्त्यांवर सजणार्या मॉलमधून खरेदी करण्याचा कल जास्त दिसून येत होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेतील रस्तेही गर्दीने हाऊसफुल झाले आहेत.
7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव त्याच भक्तीभावात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. हजारो चाकरमानी गणपतीसाठी गावी येणार आहेत, पण शहरात राहून घरी बाप्पा आणणार्यांची संख्याही हजारोंच्या वर आहे. त्यामुळे आपल्या बाप्पाची मूर्ती सुबक दिसण्यासोबत त्याला साजेसा मखर, सजावट करण्याची लगबग सध्या सर्वत्र दिसत आहे. त्यातच बाप्पाच्या आगमनाआधीची हक्काची म्हणजे सुट्टी एक आठवड्याआधी मिळाल्याने ती खरेदीसाठी सत्कारणी लावल्याचा बेत रायगडकरांनी आखल्याचे दिसले. सकाळपासूनच बाजारात त्यामुळे गर्दी होण्यास सुरुवात झाली. दुपारच्या जेवणानंतर ही गर्दी हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली.
फूलबाजारात गर्दी
रायगड जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये हार, फुले, पूजेचे साहित्य, अलंकार, नैवद्य, सजावटीचे साहित्य किरकोळ सामान घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. बाजारपेठ आणि फुलबाजार हा विविध साहित्य, पणती धूप, अगरबत्ती, सजावटीच्या कंठमाळा आदी साहित्यांच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणपतीच्या आगमनाला दोन दिवस असल्याने फूुलबाजारात गर्दी नव्हती, मात्र सजावटीसाठी कृत्रिम शोभेच्या फुलांना यंदाही मागणी असल्याचे दिसून आले. कपडे घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसले. रस्त्यावर चालण्यासही जागा नसल्याने येणार्या-जाणार्या वाहनांना कोंडीची समस्या उद्भवली.
खरेदीवर अखेरचा हात अलिबाग बाजारपेठ असलेल्या बाजारात विविध पूजेच्या लहानसहान साहित्यांची दुकानेही सजलेली आहेत. शहरात सलग असलेल्या दुकानांमध्ये आकर्षक विद्युत माळा, कृत्रिम फुलांच्या विविध आकाराच्या आणि रोषणाईच्या मखर, कृत्रिम फुलांच्या सजावटीच्या अनेक मखरी पाहायला मिळाल्या. नेहमीप्रमाणे गणेशोत्सवाची खरेदी ही जोमात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुकानदारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे महागाईने उच्चांक गाठला असला तरी खिशाला परवडेल आणि झेपेल इतकी खरेदी भक्तांनी केली आहे. त्यात उत्साहाची कंजुषी कुठेच दिसली नाही. त्यामुळे व्यापारीवर्गातही आनंदाचे वातावरण आहे.