उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू

| पनवेल | वार्ताहर |

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात जाणार्‍या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वेने आणखी 26 उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शनिवार, सोमवार आणि बुधवारी धावणार आहेत. त्यांचे आरक्षण गुरुवार (दि. 4) पासून सुरू झाले आहे.

मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीच्या अनुषंगाने देशभरात सुमारे 919 गाड्या सोडल्या आहेत. त्यापैकी अर्ध्याहून अधिक गाड्यांची बिहार आणि उत्तर प्रदेशसाठी धावाधाव सुरू असून कोकणवासीयांसाठी केवळ 74 गाड्या सुटणार असल्याचे समजताच कोकणवासीयांत संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे उशिरा का होईना रेल्वेने आणखी 26 गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उशिरा कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना दिलासा मिळणार असून परतीच्या प्रवासादरम्यान मोठी सोय होणार आहे.

रोहा, माणगावलाही थांबा

01129 ही विशेष गाडी 6 मेपासून 3 जूनपर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.15 वाजता सुटणार आहे; तर 01130 ही विशेष गाडी 7 मे पासून 4 जूनपर्यंत दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी थिविम येथून 16.40 वाजता मुंबईसाठी सुटणार आहे. या दोन्ही गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्‍वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबा असणार आहे.

Exit mobile version