। मुंबई । वार्ताहर ।
उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि बलिया, गोरखपूरदरम्यान १८२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई-बलिया त्रै-साप्ताहिक विशेष ७८ फेऱ्या होणार आहेत. ०१०२५ विशेष गाडी १ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि बलिया येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे.
०१०२६ विशेष गाडी ३ एप्रिल ते १ जुलैपर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बलिया येथून दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे. मुंबई-गोरखपूर आठवड्यातून ४ वेळा विशेष १०४ फेऱ्या धावणार आहे. यामध्ये ०१०२७ विशेष गाडी आठवड्यातून ४ वेळा २ एप्रिल ते ३० जून पर्यंत दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे. तर ०१०२८ विशेष गाडी आठवड्यातून ४ वेळा ४ एप्रिल ते २ जुलैपर्यंत दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गोरखपूर येथून २.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे.
या संपूर्ण विशेष गाड्यांमध्ये एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे राहणार आहे. या गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग २७ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.