। बंगाल । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचं पथक पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट इथं बीरभूम हिंसाचार प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआय अधिकारी परिसरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड तपासत असून यासाठी त्यांनी तांत्रिक टीमचीही मदत घेतलीय. तपासादरम्यान सीबीआयला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले असून पश्चिम बंगालाचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी त्यांच्या निशाण्यावर आहेत. सीबीआयला आणखी महत्त्वाचे पुरावे मिळाल्यास बीरभूम हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केव्हाही अटक होऊ शकते.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय तांत्रिक पथकाची मदत घेत आहे. सीबीआय सुरुवातीला पोलिसांच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड गोळा करत आहे. भोदू शेखच्या हत्येनंतर पोलीस ठाण्याच्या व जिल्ह्यातील उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका काय होती? ते आपापसात किती वेळा बोलले याचे रेकॉर्ड गोळा केले जात आहेत. कोलकाता उच्च न्यायालयानं यापूर्वीच सीबीआयला निर्देश दिले आहेत की, ते कोणाचीही चौकशी करू शकतात आणि कोणालाही अटक करू शकतात. अशा स्थितीत आज पीडितांशी बोलल्यानंतर सीबीआयला अनेक पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध पुरावे सापडलेत. बीरभूम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) नागेंद्रनाथ त्रिपाठी आणि इतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी आता सीबीआयच्या रडारवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूरहाट पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी निरीक्षक त्रिदीप प्रामानिक आणि रामपूरहाटचे तत्कालीन एसडीपीओ सायन अहमद यांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाऊ शकते, असंही बोललं जातंय.