पर्यटकांसाठी विशेष सोयी-सुविधा
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुंबईपासून 154 किमी अंतरावर पनवेल-मुरूड मार्गावर 52 चौरस कि.मी. क्षेत्रावर विस्तारलेल्या या अभयारण्याला जणु निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड-जंजिरा संस्थानाचे नवाब सिद्दी यांचे राखीव शिकार क्षेत्र होते. येथील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने 1986 साली फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले. भारतातून हजारो पर्यटक फणसाडला भेट देत असतात. खासकरून पावसाळी अतिशय सुंदर वातावरण असते. घनदाट झाडी असल्याने पावसाचे प्रमाण खूप आहे आणि हे ठिकाण उंचावर असल्याने उन्हाळ्यात देळखील थंड वातावरण असते. येथील शेकडो पाणवठे पावसाच्या पाण्याने भरतात. प्राणी जलक्रीडा करण्यासाठी पाणवट्यावर येताना दिसतात.
पावसाळ्यात फणसाड धरण पुर्णपणे भरून त्याच्या वाहून जाणार्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक भोईघर येथे येत असतात. भोईघर गावातून फणसाड धरण 10 मिनिटांवर असल्याने गावाला पर्यटन व्यवसाय मिळतो. अभयारण्यातील नदीकाठी वैविध्यपूर्ण जंगलात सुमारे 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात. पश्चिम घाटांतर्गत येणार्या या भूप्रदेशाचे उष्णकटीबंधीय हवामान असून तापमान किमान 25 ते कमाल 35 अंश सेल्सीयस इतके असते.
अभयारण्यात भटकंतीसाठी विशेष वाटा (ट्रेल) तयार करण्यात आल्या आहेत. त्यात फणसाडगाण, धरणाधीमान, चिखलगाण, सावर तलाव सुपेगाव देवराई यांचा समावेश आहे. गाण म्हणजे पाण्याची जागा. फणसाड वन्यजीव अभयारण्यात तम्बल 27 पाणस्थळे आहेत. यातील चिखलगाण पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात. त्यांचे जवळून निरीक्षण करता यावे यासाठी एक खास एक लगूगृह बांधण्यात आले आहे. तसेच, पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. यातून दिसणारे दृष्य मन मोहून टाकणारे आहे. स्थानिकरित्या आढळणारे जांभा दगडातील नवाबाने खास शिकारीसाठी बांधले आडोसे जागोजागी आजही पाहायला मिळतात. येथील पर्यटकांच्या सुविधेसाठी वन खात्याने बांबु व सुपारीची धोटी घरे बांधण्यात आली आहेत. तसेच, वेळप्रसंगी तंबूमध्ये राहण्याची सोय केली जाते. त्यामुळे पर्यटकांमध्ये आणखी वाढ होताना दिसत आहे. या ठिकाणी ठराविक प्राणी-पक्षी हमखास दर्शन देतात. तसेच, पर्यटकांना वनभोजनाचा आनंद गावातील महिला बचत गट देत असतात.
अभयारण्यातील वनसंपदा फणसाड अभयारण्यात साग व निलगिरीची रोपवने यासह प्रामुख्याने एैन, किंजळ, जांभूळ, द्वेद, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक नरक्या याबरोबरच सीताअशोक, सर्पगंधा, कुरडु, रानतुळस, कढीपत्ता उक्षी या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेली व जगातील सर्वात लांब वेलींपैकी एक असलेली गारंबीच.
अभयारण्यातील वन्यजीव फणसाड अभयारण्यात 17 प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, सांळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू येथे हमखास दृष्टीस पडते.