| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका सुनंदा सखाराम पवार (आक्का) यांचे बुधवारी (दि.25) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, सुना, जावई नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार यांच्या त्या पत्नी, जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अलिबागचे माजी नगरसेवक उमेश पवार तसेच उदय पवार यांच्या मातोश्री होत.
सुनंदा पवार या उत्तम गृहिणी होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. असंख्य विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम त्यांनी शिक्षक म्हणून केले. ज्या काळात स्त्री शिक्षणाची वाट बिकट होती, सामाजिक रुढींचे अडथळे पावलोपावली होते, अशा काळात आपल्या जिद्दीने शिक्षिका बनून समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम त्यांनी खंबीरपणे केले. अलिबागमधील जुनी पोस्टाची गल्ली मयेकरवाडीसमोर राहत्या घरी बुधवारी (दि.25) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. रामनाथ येथील स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अलिबागचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, ॲड. प्रवीण ठाकूर, ॲड. उमेश ठाकूर, चेतन पाटील, ज्येष्ठ पत्रकार उमाजी केळुसकर, आर.के. घरत, श्रीरंग घरत, शरद कोरडे, नंदू तळकर, सत्यजीत दळी, ॲड. राजेंद्र जैन, विनोद टेबुर्लेकर, हेमकांत सोनार, पंत भक्त मंडळाचे सदस्य, मराठा समाजाचे ज्येष्ठ मंडळी तसेच वाघोडे येथील ग्रामस्थ, नातेवाईक यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचा दशक्रिया विधी आणि उत्तरकार्य शुक्रवारी (दि.6) होणार असल्याची माहिती पवार कुटुंबियांकडून देण्यात आली.







