| पेण | प्रतिनिधी |
वाशी ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला धुळ चारण्यात इंडिया आघाडीला पहीले यश आले आहे. प्रभाक क्रमांक तीनमधून (ना.म.प्र) सुनंदा सुनिल थवई या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सोमवारी तहसिलदार कार्यालयात अर्जाची छाननी पार पडली. थवई यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने निवडणुक अधिकाऱ्यांनी थवई यांना विजयी घोषित केले. त्यांच्या निवडीने इंडिया आघाडीच्या गोटात आनंद आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचासह 11 सदस्य आहेत. त्यासाठी निवडणुक 5 नोव्हेंबरला होणार आहे. मात्र भाजपाला प्रभाग 3 मध्ये उमेदवारच मिळाला नाही. या ठिकाणी भाजपचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे वर्चस्व असल्याचे बोलले जायचे. परंतु तो आता फुसकाबार होता हे सिध्द झाले आहे. ज्या पक्षाची केंद्रात, राज्यात सत्ता आहे. त्या राष्ट्रीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाला आपल्या ग्रामपंचायतीमध्ये साधा एक उमेदवार मिळू नये, यापेक्षा दुर्दैव ते काय. पाटील यांच्या विषयी असलेल्या नाराजीमुळे वाशी ग्रामपंचायतीमध्ये त्यांना पुर्ण पॅनल देखील उभे करता आले नसल्याचे त्यामुळे समोर आले आहे.
पेण तहसिल कार्यालयाच्या समोर इंडिया आघाडीचे नेते प्रसाद पाटील, अनंत पाटील, पंचायत समिती सदस्य निलकंठ दिवेकर, सरपंचाचे उमेदवार संदेश ठाकूर यांच्यासह सर्व उमेदवारांनी पुष्पगुच्छ देऊन सुनंदा थवई यांचे अभिनंदन केले. पाटील यांना पुर्ण पॅनलसाठी उमेदवारांची जमवा-जमव करता न आल्याने वरिष्ठांकडून त्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची चर्चा दिवसभर पेण शहरात ऐकायला मिळत होती.