। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागच्या अद्ययावत नेत्रचिकित्सा, शस्त्रक्रिया व नेत्रचिकित्सक प्रशिक्षण केंद्र अशा नेत्ररुग्णालयाच्या सोगाव येथील नवीन इमारतीचा भूमीपूजन समारंभ रविवार, 14 नोव्हेंबर रोजीसकाळी 10-30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. अलिबाग परिसरातील 4 लायन्स क्लब एकत्र येऊन लायन्स हेल्थ फॉउंडेशन ही संस्था 2016 मध्ये स्थापन केली आणि या संस्थेतर्फे चोंढी, अलिबाग येथे एक अद्ययावत नेत्ररुग्णालय सप्टेंबर 2017 पासून सुरु करण्यात आले. आज या रुग्णालयात मोतीबिंदूच्या अत्याधुनिक शस्त्रक्रियेबरोबरच रेटिना, कॉर्निया, बुबुळ, तिरळेपणा इत्यादी सर्वप्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच उपचार केले जातात. या नेत्ररुग्णालयाची इमारत लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या मालकीची नव्हती. ही बाब लक्षात घेता सोगाव फाऊंडेशनच्या वतीने स्वत:च्या मालकीची नवीन अद्ययावत इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीचा भूमीपूजन समारंभ लायन्स इंटर नॅशनल डायरेक्टर व्ही.पी. नंदकुमार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी पीएमसी अँड एलसीआयएफ कॅम्पेन 100 एरिया लीडर हनुमान अगरवाल, मल्टिपल कौन्सिल चेअरमन राकेश चौमल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लुनकरन तावरी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-1 मुकेश तनेजा, डिस्ट्रिक गव्हर्नर-2 अमरचंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहती लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष नितीन अधिकारी, सचिव प्रवीण सरनाईक यांनी दिली आहे.