रोहित, विराट यांची नावे नसल्याने केली नाराजी व्यक्त
| मुंबई | वृत्तसंस्था |
5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकतेच चार संघ जाहीर केले. या चारही संघात भारताच्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नाव दिसत आहेत. राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असा सल्ला बीसीसीआयने दिला होता. त्यानुसार आता लोकेश राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव पासून ते श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आदी खेळाडू आता दुलीप ट्रॉफीत खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेसाठी निवडलेल्या चार संघात मात्र रोहित शर्मा व विराट कोहली यांचे नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यावर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रोहित, विराट यांच्यासह जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व हार्दिक पांड्या यांनाही बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या नियमातून सूट दिली आहे. वर्कलोड आणि फिटनेस डोळ्यासमोर ठेवता जसप्रीत बुमराहला दिलेल्या विश्रांतीचा बचाव मात्र गावस्करांनी केला. 2018 पासून हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. दुलीप ट्रॉफीनंतर भारतीय खेळाडू बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध कसोटी मालिकेत खेळताना दिसतील. पण, रोहित व विराट यांची दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या संघातील अनुपस्थिती लिटल मास्टर गावस्कर यांना खटकली आहे. या अनुभवी खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी सराव करण्याची ही संधी होती, असे गावस्कर यांचे मत आहे. ‘निवड समितीने रोहित शर्मा व विराट कोहली यांची दुलीप ट्रॉफीसाठी निवड केलेली नाही.
या दोघांनाही बांगलादेश कसोटी मालिकेत सरावाशिवाय खेळावे लागणार आहे,’ असे गावस्कर म्हणाले. एखादा खेळाडू तिशीच्या मध्यापर्यंत मजल मारतो तेव्हा त्यांना उच्च दर्जा राखणे कठीण होते. कारण, त्यांची स्नायूंची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते आणि नियमित क्रिकेट खेळणे हाच यावर उपाय असल्याचे ठाम मत गावस्कर यांनी मांडले. जसप्रीत बुमराहला दिलेली विश्रांनी समजू शकतो, असेही ते म्हणाले. जय शाह काय म्हणाले होते? जय शाह यांनी सांगितले होते की, विराट, रोहित, बुमराह यांच्याव्यतिरिक्त सर्वजण खेळत आहेत, तुम्ही याचं कौतुक करायला हवं. रोहित आणि विराट सारख्या खेळाडूंवर दुलीप ट्रॉफी खेळणे थोपवले नाही पाहिजे. त्यांना दुखापत होऊ शकते आणि आगामी आंतरराष्ट्रीय मालिका लक्षात घेता ही जोखीम पत्करायची नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देशात प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही. आपण खेळाडूंना सन्मानाने वागवले पाहिजे.