| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
शिक्षण विभागाच्या मांडला केंद्रात सुनील पाटील यांची सेवाज्येष्ठतेने केंद्रप्रमुखपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी अलिबाग तालुक्यातील मानीभूते शाळेवर मुख्याध्यापकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत शासनाकडून पाच लाखांचे बक्षीसही मिळवले आहे. राज्य आदर्श शिक्षक हा अतिशय मानाचा पुरस्कार मिळवलेल्या पाटील सरांची अध्यापनाची मनोरंजक शैली, विद्यार्थ्यांप्रती आपुलकी, शिस्त, विविध सहशालेय उपक्रमातील सहभाग, क्रीडास्पर्धा यातून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी यशाचा राजमार्ग दाखवला. याची कृतज्ञता बाळगून माजी विद्यार्थ्यांसहित ग्रामस्थांनी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले. निरोप समारंभाच्या औचित्याने सरांच्या हस्ते शाळेसाठी तयार केलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मानी ग्रामपंचायत सरपंच अस्मिता म्हात्रे, वायशेत केंद्रप्रमुख विकास पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक म्हात्रे, रोशनी पाटील, पत्नी संध्या पाटील, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष महेश म्हात्रे, रमेश धुमाळ, स्वाती म्हात्रे, संगीता बरवड, अनिषा पाटील यांसह केंद्रातील सर्व शिक्षक, पोलीस पाटील, अन्य सरकारी कर्मचारी यांनी आपल्या मनोगतात पाटीलसरांविषयी गौरवोद्गार काढले. यावेळी शंभराहून अधिक माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन संदेश घरत यांनी, तर आभार प्रदर्शन रुपाली भोबू यांनी केले.