66 हजार महिला लाडकी बहिण योजनेच्या लाभापासून वंचित
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात 1 लाख 11 हजार महिलांचे आधार प्रमाणीकरण होत नसल्याने महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिल्या होत्या. वंचित राहिलेल्या 45 हजार महिलांच्या खात्यांना आधार जोडणी करण्यात बँकांना यश आले आहे. त्यामुळे या महिलांना लाभाची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आधार जोडणी अभावी अजूनही 66 हजार महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. यामुळे आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या उमेदवारांना लाडक्या बहिणीच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
रायगड जिल्ह्यातून मुख्यमंंत्री लाडकी बहीण योजेसाठी पहिल्या टप्प्यासाठी 1 लाख 81 हजार अर्ज प्राप्त झाले होते. दुसर्या टप्प्यात 1 लाख 68 हजार प्राप्त झाले. अशा प्रकारे एकूण 3 लाख 49 हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे. सुरवातीला 26 हजार अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. नंतर या दूर करण्यात आल्या. 818 अर्ज बाद ठरले होते. 14 ऑगस्टपासून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली. मात्र ज्या खात्यांना आधार जोडणी झालेली नाही अशा खात्यांवर योजनेच्या लाभाची रक्कम जमाच होऊ शकलेली नाही.
जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार महिलांचे अर्ज आधार लिंकेज अथवा सिडींग नसल्याने, लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी प्रलंबित राहिले होते. त्यामुळे इच्छूक लाभार्थी महिलांची ठिकठिकाणच्या बँकेच्या शाखांमध्ये गर्दी केली होती. यापैकी 45 हजार अर्जदार महिलांच्या खात्यांचे आधार जोडणी करण्यात जिल्ह्यांतील बँकांना यश आले आहे. मात्र 66 हजार खात्यांचे आधार जोडणी अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे या 66 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. मात्र लाभ हस्तांतरण करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या खात्याला आधार कार्डाची जोडणी आवश्यक आहे. सुरक्षित आणि पारदर्शक माध्यमातून महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि पैसे सहज आणि त्वरीत जमा व्हावेत हा आधार प्रमाणिकरणा मागचा हेतू आहे. मात्र लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणार्या लाख भर महिलांच्या खात्यांना आधार जोडणी नसल्याने या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.
लाभार्थी महिलांचे बँक खाते आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महिला वर्ग मोठया संख्येने बँकांमध्ये येत आहे. दुसरीकडे या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. अनेक लाभार्थी महिलांची बँक खाती जुनी आहेत त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यातच बँक कर्मचार्यांचा वेळ जात आहे. त्यामुळे नियमित कामांवर त्याचा परीणाम होताना दिसत आहे.
अशी आहे अडचण
लाभार्थी महिलेचे एकच बँक खाते आधारशी लिंक करता येऊ शकते. त्याचे प्रमाणीकरण होऊ शकते. मात्र लाभार्थी महिलेनी दुसरा बँक खाते क्रमांक तर त्या खात्याला आधार लिंकेज करता येत नाही. त्यामुळे या महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे एनपीसीआय पोर्टलवर जाऊन लाभार्थी महिलेच्या बँक खात्याचे आधार सिडींग अथवा डिसिडींग करून घ्यावे लागते.