सुनील तटकरे दगाबाज- आ. जयंत पाटील

| खोपोली | प्रतिनिधी |

सुनील तटकरे दगाबाज असून, त्यांनी बॅ. ए.आर.अंतुले यांच्यापासून माझ्यापर्यंतच्या सर्वांनी मदत करूनही आम्हाला पाठ दाखवली. शरद पवार यांनी तर त्यांच्या घरातल्या जवळपास प्रत्येकाला आमदारकी दिली. खुद्द त्यांना खासदार केले. तरीही त्यांनी त्यांच्याशी बदनामी केली. आता या सगळ्याचा समाचार म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत बदला घेणारच, असा निर्धार माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला असल्याचे शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी प्रतिपादन केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आ. जयंत पाटील यांनी बुधवारी (दि.1) खालापुरात पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील, ज्येष्ठ नेते संतोष जंगम, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, रवींद्र रोकडे, कैलास गायकवाड, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, जयंत पाठक, शांताराम पाटील, संतोष पाटील, खालापूर शहर चिटणीस आकेश जोशी, नरेंद्र शहा यांच्यासह खोपोली शहर तसेच खालापूर नगरपंचायतीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष विचारधारेवर आधारित पक्ष आहे. इतकेच नव्हे, तर पक्षाला 75 वर्षांची परंपरा आहे. तो पक्ष तटकरेंच्या सांगण्याने संपणार नाही. आजवर अनेक नेते पक्षात आले, मोठे झाले आणि निघून गेले. मात्र, पक्ष संपलेला नाही. सत्ता येते-जाते, पण कधी विचार संपत नसतात. खुद्द तटकरे यांचे वडीलदेखील शेकापमध्ये होते, याचा त्यांना विसर पडला आहे, असा खोचक टोलादेखील आ. जयंत पाटील यांनी लगावला. जर शेकापक्ष संपला असं वाटत असेल, तर तुम्हाला आमची चिंता कशाला भेडसावते आहे, असा मार्मिक टोला जयंत पाटील यांनी लगावला. मागच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच तटकरे खासदार झाले. मात्र, त्याच कार्यकर्त्यांनी त्यांना हरविण्याचा निर्धार केला असल्याचे सांगत शेकाप रायगडातून हद्दपार करणार असे म्हणणारे तटकरेच राजकारणातून हद्दपार होणार, असे सूतोवाच त्यांनी केले. रायगड आणि मावळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचा प्रत्येक घटक मोठ्या जोमाने कामाला लागला असून, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता तन-मन-धन अर्पण करुन हिरीरीने प्रचारात भाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version