भ्रष्टाचाराचे डाग गडद; सिंचन घोटाळ्यातून नाव वगळल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांची उच्च न्यायालयात धाव
| अलिबाग | प्रतिनिधी |
सिंचन घोटाळ्याप्रकरणी एफआयआरमध्ये नाव दाखल असतानादेखील सुनील तटकरे यांचे नाव का वगळण्यात आले? याबाबत सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली. त्यानुसार त्यांनी सुनील तटकरेंसह 15 जणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट पिटीशन दाखल केली असून येत्या 7 मे रोजी त्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार ऐन निवडणूकीत अडचणीत सापडले आहेत.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांची कसून चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आली. मात्र सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांचे नाव चार्जशिटमधून वगळण्यात आले.
याबाबत रोहा येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली. त्यामुळे सत्य समोर आले. मिळालेल्या पुराव्याच्या आधारे भ्रष्टाचार करणाऱ्या सुनील तटकरे यांच्याविरोधात तक्रार असताना हे प्रकरण दाबण्यात आले असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. याशिवाय राष्ट्रवादीमधील एका कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून याप्रकरणाचा पाठपुरावा केला व संबंधित कागदपत्रे मिळविण्यात आली असून मुंबई उच्च न्यायालयात तटकरे यांच्याविरोधात फौजदारी रिट पिटीशन दाखल करण्यात आली असल्याचेही सय्यद यांनी सांगितले.
तटकरेंना मतदान करू नका; बबलू सय्यद यांचे आवाहन काँग्रेस व राष्ट्रवादीची युती असताना सुनील तटकरे यांनी युतीचा भंग करून रवि पाटील यांना निवडणूकीत पाडले. त्यांचा मुलगा माजी आ. अनिकेत तटकरे यांना निवडून दिले. दरम्यान माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दत्तक घेतलेली ग्रामपंचायत स्वतःच्या पक्षाच्या ताब्यात घेतली. या निवडणूकीत भाजपचे कार्यकर्ते तटकरेंना मदत करीत आहेत. लोकसभेनंतर विधानसभेत युती होणार नाही. त्यामुळे आपले अमुल्य मत तटकरेंना देऊ नका, असे आवाहन भाजप कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांनी केले आहे.