29 भाविक जखमी
। नाशिक । प्रतिनिधी ।
नाशिक जिल्ह्यातील वणी-नांदुरी मार्गावर मोहनदरी फाट्याजवळ टेम्पो उलटून झालेल्या अपघातात 29 भाविक जखमी झाले. यातील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी (दि. 29) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमी हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील असून सध्या ते नाशिकच्या पाथर्डी भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे.
पाथर्डी येथील काही कुटुंबीय नातेवाईकांसह मंगळवारी सकाळी दोन वाहनांतून सप्तश्रृंगी गडाकडे निघाले होते. वणीवरून नांदुरीकडे जात असताना दरेगावलगतच्या मोहनदरी फाटा भागात वळणावर टेम्पोचा अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटून टेम्पो उलटला. टेम्पोत लहान-मोठ्यांसह 29 जण होते. अपघाताची माहिती मिळताच वणी आणि नांदुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
जखमींमध्ये दोन ते सात वर्ष वयोगटातील पाच बालकांसह 12 महिलांचा समावेश आहे. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे