तटकरे जमिनींचे दलाल

‘बाळगंगा’ तटकरेंमुळे बंद पडला; आ. जयंत पाटील यांचा पेणमध्ये घणाघात

| पेण | प्रतिनिधी |

बाळगंगा प्रकल्प सुनील तटकरेंमुळेच बंद पडला, अशी घणाघाती टीका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची पहिली बैठक पेण तालुक्यातील तुळसी हॉटेल येथे शुक्रवारी (दि. 12) पार पडली. यावेळी आ. पाटील यांनी कार्यकर्त्यांर्‍यांशी संवाद साधला. तटकरे जलसंपदा मंत्री असताना हा प्रकल्प बंद पडला असल्याने त्यांच्याकडे पेणकरांजवळ मत मागण्याची नैतिकता नाही. बाळगंगा हे सिडकोचे धरण असल्याने सिडकोने माझ्या शेतकर्‍यांना पैसे द्यावेत. आज एमएमआरडीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या जमिनी शासन घेऊ पाहात आहे. आम्हाला जमिनी विकायच्या नाहीत, तर आम्हाला तिसर्‍या मुंबई प्रकल्पामध्ये भागीदारी हवी आहे. तटकरे जमिनी विकत घेतो आणि चढ्या भावाने विकतो. तो जमिनींचा दलाल आहे. त्यामुळे तटकरेंना पेणकर मत देणार नाहीत, याबद्दल माझ्या मनात साशंकताच नसल्याचे म्हणत आ. पाटील यांनी तटकरेंचा खरपूस समाचार घेतला.

तटकरेंनी पेणवर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचत आ. जयंत पाटील यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात जास्त अन्याय पेणकरांवर केला आहे. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्य पेणमध्ये गीतेंना मिळणार, यात काहीच शंका नाही. बाळगंगा धरण कोणामुळे बंद पडले? याचे उत्तर एकच- बाळगंगा धरण तटकरेंमुळे बंद पडले. बाळगंगाची मूळ किमतीपेक्षा दीडशे टक्के किंमत वाढवून प्रकल्प बंद पडले. मूळ किंमत 368 कोटी ती 1,220 कोटींवर गेली आणि बाळगंगा धरणाचे काम बंद पडले. त्यावेळेला जलसिंचन मंत्री कोण होते? त्यामुळे पेणकरांजवळ मत मागण्याची नैतिकता तटकरेंजवळ नाही.

पुढे आ. जयंत पाटील यांनी सांगितले की, 25 वर्षे मी अनंत गीते जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये एकत्र येतो. पंतप्रधान सडक योजनेंतर्गत सर्वात जास्त निधी अनंत गीते यांनी वापरला आहे. गेल्या निवडणुकीत पवारसाहेबांच्या सांगण्यावरुन मी मदत केली. परंतु, त्याची पतफेड कशी केली, ती सर्व रायगडकरांना माहीत आहे, त्यामुळे मागच्या निवडणुकीत केलेली चूक दुरुस्त करणार आहे, रायगडकर इतिहास घडवतील आणि तटकरेला हद्दपार करतील, असेही ते म्हणाले.

या सभेचे प्रास्ताविक माजी जि.प. सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांनी केले, तर अतुल म्हात्रे, प्रशांत पाटील, अशोक मोकल यांनीदेखील आपले मनोगत मांडले. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प. सदस्य शेकाप महादेव दिवेकर, शिवसेना संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, जि.प. सदस्य किशोर जैन, शेकापचे शिक्षणमहर्षी पी.डी. पाटील, काँग्रेसचे अशोक मोकल, प्रवीण पाटील, रायगड जिल्हा संघटीका दिपश्री पोटफोडे, शेकाप पक्षाच्या स्मिता पाटील, अविनाश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीला हमरापूर विभागातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक यशस्वी होण्यासाठी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे यांनी मेहनत घेतली.

जो आपल्या गुरुंचा झाला नाही, तो तुमचा काय होईल - अनंत गीते
रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर चौफेर फटकेबाजी केली. जो माणूसआपले गुरूतुल्य असलेले बॅ. अतुंलेसाहेब ज्यांनी राजकारणाचे बारसे घातले आणि ज्या पवारसाहेबांनी राजकारणात भरभरून दिलं, त्यांचा झाला नाही, तर सर्वसामान्य जनतेचा काय होईल, अशी टीका केली. आजपर्यंत रायगडमध्ये नीच आणि गलिच्छ राजकारण सुनील तटकरे यांनी केल्याचेही ते म्हणाले. बॅ.ए.आर अंतुले, शरद पवार, जयंत पाटील, मधुकर ठाकूर यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या या पाप्याला रायगडमधून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा गीतेंनी दिला.

श्रीवर्धनच्या सभेत आ. जयंत पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली, त्याचवेळी शरद पवारसाहेब उद्धव साहेबांना म्हणाले मला याला (तटकरेला) गाढायचे आहे आणि त्यासाठी अनंत गीतेच उमेदवार हवाय. जरी माझी उमेदवारी आता जाहीर झाली असली, तरी ही उमेदवारी श्रीवर्धनच्या सभेमध्येच निश्‍चित झाली होती. पेण तालुक्याने दरवेळेला मला मताधिक्य दिलेले आहे. तिन्ही निवडणुकांमध्ये मला कधीच नाराज केलेले नाही, त्यामुळे सर्वाधिक मतं या चौथ्या निवडणुकीमध्ये मलाच मिळणार यात काही शंकाच नाही, असा विश्‍वासही गीतेंनी व्यक्त केला.

पुढे अनंत गीते यांनी सांगितले की, भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार 500 पैकी 172 जागा भाजपला मिळणार आहे. यांना 200 चाही आकडा पार करता येणार नाही. म्हणून खोटं बोला, पण रेटून बोला, अशा उक्तीप्रमाणे मोदी अबकी बार 400 पार असे ओरडत आहेत. देशात मोदींविरुद्ध त्सुनामी येणार आणि देशाचे पंतप्रधान हे राहुल गांधीच होणार, असेही ते म्हणाले.

Exit mobile version