…अन् खा. सुनील तटकरेंनी भरला दम

महामार्गाच्या कामाचा दर्जा सुधारा; राष्ट्रीय महामार्ग अधिकार्‍यांची कानउघाडणी
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa express way) चौपदरीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम मजबूत व दर्जेदार व्हावे यासाठी खा. सुनिल तटकरे यांनी सोमवारी दि.(14) महामार्ग पाहणी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. या महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी व उणिवा ठेवल्या आहेत. त्यामुळे हा महामार्ग धोकादायक स्थितीत असून निष्पाप जीवांचे बळी जात असल्याबाबत चिंता व्यक्त केली. कामाचा दर्जा सुधारा, अन्यथा ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू, असा सज्जड दम देखील खा. तटकरे यांनी यावेळी दिला.

कोलाड आंबेवाडी नाका येथे कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पाण्याचा योग्य निचरा होणेकरिता जलद उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना .तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांना दिल्या.याबरोबरच कुंडलिका नदी पूल व मईस दरा नदी पूल यांच्या पुलाच्या कामाची पाहणी केली. सदर पुलाचे काम दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करून वाहतुकीस खुले करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या पाहणी दौर्‍यात सुकेळी खिंड, वाकण नाका, नागोठणे ब्रीजची पाहणी केली. तसेच महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवून मार्ग सुखकर करण्याबाबतचे आदेश यावेळी प्रशासनाला देण्यात आले. महामार्गावर अनेक ठिकाणी योग्यपद्धतीने काम झाले नसल्याने खा.तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.

राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे यांनी महामार्ग कामातील त्रुटी जलदतेने दूर करून सुरक्षित प्रवास व वाहतुकीसाठी मार्ग सुसज्ज करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी पाहणी दौर्‍यात इंजिनिअर टीम लीडर नागराज राव, अभिषेक अग्रवाल, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, प्रीतम पाटील, राकेश शिंदे, गणेश वाचकवडे, संजय राजीवले, संजय मांडलुस्कर, कोलाड सरपंच सागवेकर, महेंद्र पोटफोडे, रामचंद्र चितळकर, श्रीकांत चव्हाण,आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या मार्गावर अनेक जीवघेणे अपघात होऊन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे, अनेकजण विकलांग झाले आहेत. अधिकार्‍यांनी तातडीने या मार्गावरील धोक्याची ठिकाणे, अपघात प्रवन क्षेत्र व रस्त्याच्या कामात आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती व सुधारणा कराव्यात अन्यथा त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील.

खा.सुनिल तटकरे

Exit mobile version