| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2026 मधील दुसऱ्या सामन्यात अखेरीस विजयाचं खातं उघडलं आहे. हैदराबादने ईडन गार्डन्सच्या मैदानावर केकेआरचा तब्बल 65 धावांनी दारूण पराभव केला आहे. सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संपूर्ण संघ 161 धावांवर सर्वबाद झाला.
सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात दणक्यात झाली. फिन एलनने पहिल्याच षटकात 25 धावा कुटत संघाला वादळी सुरूवात करून दिली. यानंतर पुढच्याच षटकात हर्ष दुबेने आपल्या गोलंदाजीवर त्याला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. एलन 7 चेंडूत 28 धावा करत बाद जाला. तर कर्णधार रहाणे 8 धावा करत माघारी परतला. तर अंगक्रिश रघुवंशीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. रघुवंशीने 29 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या आणि सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. तर उपकर्णधार रिंकू सिंहने 35 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. केकेआरकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. यानंतर इशान मलिंगा आणि नितीश रेड्डी या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्ष दुबेने फिन एलनला बाद करत संघाला सर्वात मोठी विकेट रिळवून दिली. कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकत सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि हैदराबादने 226 धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्माच्या जोडीने संघाला वादळी सुरूवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्येच 82 धावा कुटल्या. हेड 46 धावा तर अभिषेक शर्मा 48 धावा करत बाद झाले, त्यामुळे दोघांचही अर्धशतक हुकलं.
यानंतर इशान 14 धावांवर, अनिकेत वर्मा 1 धाव करत बाद झाले. हेनरिक क्लासेनने 35 चेंजूत 4 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. तर नितीश रेड्डीने 39 धावांचं योगदान दिलं. यानंतर हर्ष दुबेने 2 चौकार लगावत संघाला संघाला 226 धावांचा आकडा गाठून दिला.






