सुपर-आठ संघ जवळपास स्पष्ट

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकाच्या सुपर-8 मध्ये कोण कोणता संघ जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यावेळी विश्‍वचषकामध्ये एकूण 20 संघांनी भाग घेतला होता. यापैकी फक्त आठ संघच पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर-8 मध्ये प्रवेश करणार आहेत. आतापर्यंत स्पर्धेच्या पुढील टप्प्यात पोहोचणार्‍या 8 पैकी 7 संघांची नावे निश्‍चित झाली आहेत. आता उर्वरित 1 जागेसाठी 2 संघांमध्ये लढत होणार आहे. आता सुपर-8 मध्ये पोहोचलेल्या संघांना प्रत्येकी 3 सामने खेळावे लागणार आहेत. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास निश्‍चित होईल.

आतापर्यंत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, यूएसए यांनी आधीच स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात म्हणजेच सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता इंग्लंडचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचणारा सातवा संघ ठरला आहे. तर, 20 पैकी 11 संघांचा म्हणजेच पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, नेपाळ, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नामिबिया, ओमान, कॅनडा, स्कॉटलंड आणि आयर्लंड या संघांचा पत्ता कट झाला आहे. तसेच, आता एका जागेसाठी दोन संघांमध्ये लढत पहायला मिळणार आहे. यामध्ये बांगलादेश आणि नेदरलँडच्या संघांचा समावेश आहे.

बांगलादेशचे गुणतालिकेत 3 सामन्यांतून 4 गुण आहेत आणि ते गटात दुसर्‍या स्थानावर आहेत. तर नेदरलँडचे 3 सामन्यांत 2 गुण आहेत. जर बांगलादेशने नेपाळविरुद्ध शेवटचा सामना जिंकला तर सुपर-8 गाठणारा तो आठवा संघ बनेल. जर बांगलादेशने हा सामना हारला आणि नेदरलँडने श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर आठवा संघ नेट रन रेटद्वारे निश्‍चित केला जाईल. त्याचवेळी नेदरलँडने शेवटचा सामना गमावला तर तो ग्रुप स्टेजमधून बाहेर पडेल आणि बांगलादेशचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचेल.

Exit mobile version