ओमानची नामिबियाला कडवी झुंज
। ब्रिजटाउन । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकातील तिसरा सामना ओमान आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओमानचा संघ 19.4 षटकात 109 धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर, नामिबियाचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण ओमान संघाने नामिबियाला कडवी झुंज दिली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणार्या नामिबियाच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा सलामीवीर मायकेल वॉन लिंगेन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर निकोलस डेव्हलिन आणि जॉन फ्रायलिंक यांनी चांगली फलंदाजी केली. निकोलसने 24 आणि फ्रायलिंकने 45 धावा केल्या. कर्णधार गेरहार्ड इरास्मसला केवळ 13 धावा करता आल्या. शेवटच्या चेंडूवर नामिबियाला विजयासाठी 2 धावांची गरज होती. पण संघ केवळ एक धावा करू शकला. अशा प्रकारे दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर झाली.
सुपर ओव्हरमध्ये नामिबियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 21 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये डेव्हिड वीसने 13 आणि कर्णधार गेरहार्ड इरास्मसने 8 धावा केल्या. यानंतर डेव्हिड वीसने सुपर ओव्हरमध्ये नामिबियाच्या गोलंदाजीची जबाबदारीही घेतली. तिसर्या चेंडूवर त्याने नसीम कुशीचा बळी घेतला आणि सुपर ओव्हरमध्ये केवळ 10 धावा दिल्या. अशा प्रकारे सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने सामना जिंकला. सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी डेव्हिड वीसला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून टी-20 विश्वचषकाची शानदार सुरुवात केली. 2012 नंतर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निर्णय होण्याची ही दुसरी वेळ आहे. 12 वर्षांपूर्वी 2012 च्या टी-20 विश्वचषकात पल्लेकेले येथे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळलेला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता, जो कॅरेबियन संघाने जिंकला होता.
ट्रम्पेलमॅनची ऐतिहासीक कामगीरी या सामन्यात नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमॅनने अप्रतिम कामगिरी केली आहे. ट्रम्पेलमॅनने एक अशी कामगिरी केली आहे जी टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला देखील करता आली नाही. त्याने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर एक मोठा विक्रम केला आहे, जो आधी कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही. रुबेन ट्रम्पेलमॅनने पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ओमानच्या कश्यप प्रजापतीला आणि यानंतर दुसर्या चेंडूवर ओमानचा कर्णधार आकिब इलियासला आऊट केले. टी-20 सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूत दोन विकेट घेणारा रुबेन ट्रम्पेलमॅन हा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्यांच्यापूर्वी कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आली नव्हती.