नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात; 25 कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना लालफितीत
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून, शुद्ध पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस थांबल्याने येथील अंबा नदीचे पाणी प्रचंड गढूळ झाले आहे. त्यामुळे पालीकरांना कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट अंबा नदीतून पाणी पुरवले जात आहे. तसेच, सांडपाणी, कंपन्यांचे प्रदूषित पाणी, कचरा आणि वाळू उपसामुळे अंबा नदीतील पाणी दूषित झाले असून, नागरिकांसह संपूर्ण जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या पाली शहरात येणारे पाणी इतके गढूळ आहे की, ते पाणी पिण्यासाठी वापरणे तर दुरूच. त्यातून अंघोळच काय, तर कपडे व भांडी सुद्धा घासले जाऊ शकत नाही. या पाण्यावर क्लोरीनेशन किंवा कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने कित्येक वर्षे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. हजारो नागरिक आणि दररोज येणारे हजारो भाविकांना नाईलाजाने हेच दूषित पाणी वापरावे लागते. तसेच, नळांतून अनेकदा जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे, किडे, तसेच गाळ आणि शेवाळ बाहेर येण्याचे प्रकार घडत आहेत.
तत्पूर्वी, 1974 मध्ये मंजुरी मिळालेल्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा खर्च आता 25 कोटींवर पोहोचला आहे. राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय लालफितीत ही योजना अडकली आहे. दर निवडणुकीत राजकीय पक्षांचे नेते व मंत्री आश्वासन देतात; मात्र, परिस्थिती जैसे थेच आहे. 2008-09 च्या सर्व्हेनुसार ही योजना 7 कोटी 79 लाखांच्या निधीतून आखली होती. पुढे क दर्जा तीर्थक्षेत्रामुळे 10 टक्के लोकवर्गणीची अट शिथिल झाली. 2022 मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर 25 कोटींचा नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, अजून तो लालफितीतच आहे.
शुद्ध पाणीपुरवठा योजनेची फाईल मंजुरीसाठी सध्या नगर विकास विभाग 33 येथे आहे. तिथे अप्पर सचिव यांची मान्यता मिळाल्यावर एक बैठक होईल, आणि त्यानंतर पुढे मंजुरीची प्रक्रिया होईल. महाराष्ट्रातील अनेक शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या सोबतच पालीतील योजनेला सुद्धा मंजुरी मिळू शकेल. पाली शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजुरी व इतर विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. शुद्ध पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
सुलतान बेनसेकर,
उपनगराध्यक्ष, पाली नगरपंचायत
