। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेल्या दिड वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून शाळा बंद आहेत. याचा दुरगमी परिणाम सर्वच स्तरावरील विदयार्थ्यांवर दिसून येतो. यामध्ये आदिवासी मुले आधिक भरडली गेली आहे. यावर उपाय योजना म्हणून पेण येथील अंकुर ट्रस्ट संस्थेमार्फत छोट्या गटात अभ्यास केंद्राची स्थापना जागतिक आदिवास दिनपासून करण्यात आली आहे.
कोरोना नंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते वादळामुळे अनेक महिने वीज नव्हती. वीज आली तर पालकांकडे मोबाईल नाही, मोबाईल होता तर रिचार्ज नाही आणि हे तिन्ही घटक असले तर मोबाईल नेटवर्कच नाही हि दुर्गम भागाची शोकांतिका आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकमंच गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अभ्यास केद्र सुरू करण्याची विनंती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांना केली होती. याला प्रतिसाद देत जागतिक आदिवास दिनापासून अंकुर अभ्यास केद्राची स्थापना करण्यात आली आहे. येथे प्रवेश करताना तपासणी व वैद्यकीय चाचणी करण्यासाठी डॉ. मैत्रीयी पाटील यांनी प्रबोधन करून मोफत वैद्यकीय सेवाही उपलबध करुन दिली आहे.
या केद्रात छोट्या गटात प्रत्यक्ष अभ्यास घेणयात येतो. अंकुर ट्रस्टमधील आदिवासी कार्यकर्ते संजय नाईक, प्रशिक्षक हिरामण शिंगवा व तरणखोप येथील बळीराम पाटील याचे मार्गदर्शन मिळाले.