न्हावाशेवा सीएचए आधार चषक संपन्न
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात सीएचएचे अपघात होत असतात. अशा अपघातग्रस्त सीएचएच्या कुटुंबाला अपघात निधी मिळावा यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. हे सलग चौथे वर्ष आहे. या एकदिवसीय स्पर्धेतून अडीच लाखांचा निधी जमा करण्यात आला असून, तो अपघात निधी म्हणून वापरला जाणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शेकाप युवा नेते निलेश म्हात्रे, उरण काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, सरपंच प्रसाद पाटील, संतोष मोकल यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचा मूळ उद्देश अपघात निधी जमा होण्याचा असल्याने अनेक राजकीय, सामाजिक बांधिलकी जपत स्पर्धेला माजी आ. मनोहर भोईर, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी जि.प. सदस्य वैजनाथ ठाकूर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी सरपंच महेश कडू आदींसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या क्रिकेट स्पर्धेला मदतीचा हात दिला. उरण तालुक्यातील पूर्व विभागातील खोपटे गावातील धसाखोशी मैदान, येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या सर्व सदस्यांनी सीएचए आधार चषकाचे आयोजनात मोलाचे योगदान दिले. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणारी न्हावा शेवा सीएचए संघटना ही उरण-पनवेल नव्हे तर, रायगडमधील जिल्ह्यातील एकमेव संघटना असल्याची कबुली मान्यवरांनी मार्गदर्शन करताना दिली.
या एकदिवसीय स्पर्धेतून 2,50,000/-रुपये निधी जमा झाला आहे आणि तो अपघात निधी म्हणून वापरला जाईल. आयोजनासाठी येणारा सर्वच खर्च संघटनेच्या प्रत्येक सभासदाने आपल्यापरिने योगदान दिले आहे. यातील एकही रुपया आयोजनासाठी वापरला जाणार नाही, असे ठाम मत न्हावा शेवा सीएचए संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे, प्रमुख अतिथी म्हणून येणार्या महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात खोपटे ग्रामपंचायतीच्या सदस्या करिष्मा कमलाकर पाटील पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर, सोनारी ग्रा.पं.चे माजी सरपंच महेश कडू यांच्या संकल्पनेतून मोबाईल लकी डॉचा मानकरी महेश आवरे ठरले. दरवर्षीपेक्षा यावर्षी या स्पर्धेला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष म्हात्रे यांनी सांगितले.