सेवा पंधरवड्याचा विद्यार्थ्यांना आधार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा स्तूत्य उपक्रम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सेवा पंधरवडा अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील 190 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. त्यामुळे या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांना पंधरवड्याचा आधार मिळाला आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने जात प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम केले जाते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर मिळावे, यासाठी समितीच्यावतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात आला. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत कार्यालयात अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय म्हणून ही कल्याणकारी योजना राबविण्यात आली.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त मागास प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडे अर्ज करण्यात आले होते. या कालावधीत 204 प्रकरणे कार्यालयात दाखल झाली. समितीने या प्रकरणातील कागदपत्रांची पुर्तता करून 190 जणांना जागेवर प्रमाणपत्र दिली. विशेष मोहिमेच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळाल्याने विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

लोकाभिमुख उपक्रम
सेवा पंधरवडा अंतर्गत सर्व महाविद्यालयांना परिपत्रक काढून माहिती पत्रक पाठविणे, अर्ज प्राप्त न केलेले तसेच त्रुटी अभावी प्रमाणपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांची तालुका व महाविद्यालयनिहाय संख्यात्मक माहिती जिल्हास्तरावर जमा करणे. वेबीनारचे आयोजन करणे. विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणे, त्रुटीयुक्त प्रकरणांची नियमानुसार, पुर्तता करून वेळेत प्राप्त प्रकरणे निकाली काढणे अशा प्रकारचे कामकाज या मोहिमेतून समितीने केले.गतिमान पारदर्शक व लोकाभिमुख उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात आले.
Exit mobile version