सहाशे जणांना प्रमाणपत्राचा आधार
मागील तीन महिन्यांत 1,177 अर्ज प्राप्त
| अलिबाग | प्रतिनिधी |
व्यावसायिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसह निवडणुकीसाठी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याची जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात लगबग सुरु झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होण्याबरोबरच व्यवसाय शिक्षणाचा हंगामही सुरु होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत एक हजार 177 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 602 जणांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. निम्म्याहून अधिक जणांना प्रमाणपत्र मिळाले आहे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात पडताळणी कार्यालय सुरु करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये 2016 मध्ये कार्यालय सुुरु केले. जातवैधता प्रमाणपत्र नागरिकांना वेळेवर मिळावे यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले. वेगवेगळी शिबिरे जिल्ह्यात राबविण्यात आली. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झाला. जिल्ह्यामध्ये जानेवावारीपासून मार्चपर्यंत एक हजार 177 अर्ज दाखल झाले. त्यात शैक्षणिक 462, सेवांतर्गत 69 व निवडणुकीसाठी 644 अर्जांचा समावेश आहे. समितीच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने निम्म्यापेक्षा अधिक जणांना याचा फायदा झाला आहे. उर्वरित 575 प्रकरणांची कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने प्रलंबित राहिली आहेत.
शाळेतच मिळणार दाखले
व्यावसायिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसह अकरा व बारावीमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वेळेवर मिळावे,त्यांच्या जातीच्या दाखल्यांची पडताळणी तातडीने व्हावी यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन दाखले द्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. समितीच्या आवाहनानंतर जिल्ह्यातील शाळांमध्येच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून देण्यात आली.
जातवैधता प्रमाणपत्रापासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. प्रत्येकाला तातडीने प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला जात आहे. – श्रीधर डुबेपाटील, अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
जनतेशी साधणार थेट संवाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता पर्व अभियान रायगड जिल्ह्यामध्ये राबविले जाणार आहे. एक एप्रिलपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून, 1 मेपर्यंत हे अभियान असणार आहे. या कालावधीत विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे वेगवेगळे दाखल्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समाजकल्याण विभागामार्फत चर्चासत्र, वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन विविध उपक्रमांचा जागर कार्यक्रमांच्या माध्यमातून केला जाणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या व मातंग समाजाच्या वस्त्यांना भेटी देणे, त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणे, रमाई आवास योजनेतून मातंग समाजासाठी घरकुले मंजूर करणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जाती पडताळणी समिती कार्यालये यांनी शिक्षण विभागाशी समन्वय करुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणे, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय,आश्रमशाळा, निवासी शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करणे, जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत प्रबोधर करणे, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेणे, जिल्हा व तालुका स्तरावर महात्मा फुले जयंती साजरी करणे, वक्त्यांना आमंत्रित करून व्याख्यानपर कार्यक्रमाचे नियोजन करणे, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे, संविधान जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे, सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम, व्याख्यान, चर्चासत्र इतर साजरे करणे, जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे, समान संधी केंद्रामार्फत नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्तीच्या योजनांच्या माहिती संदर्भात विशेष अभियान राबविणे, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, सफाई कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य शिबिर, जनजागृती शिबिर, मेळावा व कार्यशाळा आयोजित करणे, समान संधी केंद्रांतर्गत महात्मा फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन साजरा करणे अशा अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.