उदरनिर्वाहाचा नवा मार्ग; जंगली मेव्यावर उदरनिर्वाह
| नेरळ | प्रतिनिधी |
मोहाचे झाड हे अनेक कारणांनी शेतकऱ्याला मदतगार असते. मात्र, या झाडावर येणारे फळ आणि त्या फळातील बिया या अनेक कुटुंबांना रोजगार देणाऱ्या ठरत आहेत. महिला वर्ग मोहाच्या झाडाची फळं वाळवण म्हणून संकलित करतात. तर, मोहाच्या झाडाच्या बियांपासून तेल काढले जाते. त्यामुळे लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
कर्जत तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणावर जंगली मेवा आदिवासी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. यावर्षी पाऊस उशीरा सुरू झाल्यामुळे जंगलातील मोहाच्या झाडांची फळे मोठ्या प्रमाणात जमिनीवर गळून पडल्या होत्या. त्यामुळे आदिवासी कुटुंबातील आबालवृद्ध सकाळीच जंगलात जाऊन या बिया गोळा करत असतात. त्यानंतर त्या बिया गावोगावी रस्त्यांच्या कडेला किंवा घरासमोरील अंगणात मोठमोठे ढीग करून उन्हात वाळवण्यासाठी पसरवून ठेवण्यात येतात. पावसाच्या सरी कोसळण्यापूर्वी या बिया चांगल्या कडक वाळवणे गरजेचे असते.
मोहाच्या झाडांची फळे मोठ्या प्रमाणात जमिनीवर गळून पडतात. मृग नक्षत्र संपून जून महिन्याचा पंधरवडा उलटल्यानंतर काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडला होता. मात्र, निसर्गाच्या या लहरीपणावर मात करत दुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी आपल्या उदरनिर्वाहाचा नवा मार्ग शोधला आहे. पाऊस लांबल्यामुळे मिळणाऱ्या कडक उन्हाचा फायदा घेत सध्या जंगलातून मोहाच्या बिया गोळा करून त्या वाळवण्याच्या कामाला वेग आला आहे. या वाळलेल्या बियांचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. स्थानिक भाषेत त्याला टोळचे तेल किंवा मोहाचे तेल असे म्हणतात. या बिया फोडून आतील मगज काढला जातो आणि वाळवून, त्या नंतर घाण्यावरून शुद्ध तेल काढले जाते. बाजारातील महागड्या खाद्यतेलाला पर्याय म्हणून आदिवासी बांधव या शुद्ध तेलाचा वापर दैनंदिन स्वयंपाकात करतात. हे तेल हाडे मजबूत करण्यासाठी, सांधेदुखीवर आणि विविध त्वचेच्या आजारांवर अत्यंत गुणकारी मानले जाते.
दरम्यान, पाऊस लांबल्याने शेतीची कामे बंद आहेत, त्यामुळे हाताला काम नव्हते. परंतु, निसर्गानेच आम्हाला हा दुसरा पर्याय दिला आहे. या बिया वाळवून बाजारात विकल्यास चांगला भाव मिळतो, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत आदिवासी कुटुंबियांना आर्थिक आधार मिळण्यास मदत झाली आहे.
