कचरामुक्तीसाठी विद्यार्थ्यांचे पाठबळ

| पनवेल । वार्ताहर ।

प्लास्टिक वर्गीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी पनवेल महापालिकेने सुका कचरा संकलन पासबुक योजना सुरू केली आहे. या योजनेचा शुभारंभ आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये झालेल्या घनकचरा विभागाच्या कार्यक्रमातून करण्यात आला.

महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमधील मुलांमध्ये प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी सुका कचरा संकलन पासबुक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विविध शाळांमधील मुलांकडून विविध वस्तू साकारल्या जाणार आहेत. तसेच या वस्तू पुन्हा त्याच शाळांनाच देण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सीएसीआरचे प्रतिनिधी नितीन वाधवानी यांनी केले आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम सार्‍या विश्‍वावर होत असल्याने सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन युनिसेफचे आनंद घोडके यांनी केले. यावेळी स्वच्छ भारत अभियानात महापालिकेचे ब्रॅण्ड म्बेसिडर व इंडियन आयडॉलचा विजेता सागर म्हात्रे यांनी महापालिकेच्या उपक्रमाबद्दल सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

राज्यातील पहिली महापालिका
कचरा वर्गीकरणासाठी सुका कचरा संकलन पासबुक योजना सुरू करणारी पनवेल महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका आहे. या स्पर्धेमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना युनिसेफ आणि महापालिकेच्यावतीने प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. यावेळी प्लास्टिकच्या दुष्परिणामावरील शॉर्टफिल्मही दाखवण्यात आली.

दिवाळी प्रदूषणमुक्त व्हावी, तसेच कमीत-कमी प्लास्टिकचा वापर करून साजरी करावी. ही योजना केवळ कागदावर न राहता विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग व्हावा, हा हेतू आहे.

गणेश देशमुख
आयुक्त, पनवेल महापालिका
Exit mobile version