| अलिबाग | प्रतिनिधी |
सरकारविरोधात एल्गार देण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी हा महिलांचा संवाद मेळावा भरविला आहे. आपली वज्रमूठ एक करून पुरोगामी विचारांना पाठबळ द्या, असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी केले.
ही भूमी संघर्षाची असून, याच भूमीत नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरीचा संप झाला. या भूमीने ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा करायला सरकारला भाग पाडले. प्रभाकर पाटील यांच्यासह याच भूमीने महिलेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. मीनाक्षी यांच्या रुपाने महिलेला मंत्रीपद दिले. जयंत पाटील, पंडित पाटील यांना घडवून त्यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांना मिळाले. याच भूमीत अनेक लढे, आंदोलने झाली आहेत. शोषित, पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे, असे अॅड. म्हात्रे यांनी सांगितले. देशासह राज्यात गेल्या सहा महिन्यांत अत्याचाराने कळसच गाठला आहे. शाळकरी मुलींपासून महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणींवर अत्याचार करून त्यांना मारून टाकण्याचे काम केले आहे. अन्याय, अत्याचाराची प्रकरणे दाबण्यासाठी सरकार पंधराशे रुपये देऊन महिलांची किंमत लावत आहे. हे पंधराशे रुपये मिळण्यासाठी महिलांना रोजगार गमवावा लागला. या पंधराशे रुपयांनी हातातले काम काढले. ही भयावह परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीचे पडघम वाजताच अवास्तव योजनांचे गाजर दाखविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. ‘एक गणवेश, एक राज्य’ हा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यामध्ये प्रचंड घोटाळा आहे. लोकप्रतिनिधींसह सरकार या गणवेशांवर टक्केवारी घेत असल्याची भयावह परिस्थिती असल्याचा आरोप अॅड. म्हात्रे यांनी केला. आता ही हुकूमशाही, दादागिरी चालणार नाही. मॅन केलेली तलवार काढण्याची वेळ आली आहे. महिलांना उद्योगात समान हिस्सा, अधिकार द्या. त्यांना विकासाची दिशा ठरविण्यासाठी निर्णय प्रक्रियेत घ्या. महिलांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता सक्षमपणे काम करावे, असे आवाहन अॅड. म्हात्रे यांनी केले.