चिपळूण नागरी पतसंस्थेचा पूरग्रस्त सभासदांना आधार

11 टक्के व्याज दराने होणार कर्जपुरवठा
जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ‘आपली माणसे आपली संस्था’ या ब्रीद वाक्याप्रमाणे पूरग्रस्त सभासदांना 11 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर 16 टक्के व्याजदर आहे. यावरून तब्बल 5 टक्के व्याजदर पूरग्रस्त सभासदांसाठी कमी करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे आतापर्यंत एक हजार पूरग्रस्त सभासदांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून दिलासा दिला आहे.

या संस्थेने या अगोदरदेखील दुष्काळग्रस्त भाग असो, कोल्हापूरमधील पूरग्रस्त असो, तसेच कोरोनाकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची भरघोस मदत देऊन सर्वांसमोर आदर्शच ठेवला होता. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेड, संगमेश्‍वर, राजापूरसह जिल्ह्यांमधील अन्य तालुक्यात व्यापारी, लहान मोठे, उद्योजक तसेच वाहनधारक, सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. चिपळूण शहर परिसरातील सर्व भाग मोठ्या प्रमाणावर पूर क्षेत्राखाली आला आहे. या सर्वांना मदतीचा हात देण्यासाठी चिपळूण नागरी पुन्हा एकदा पुढे सरसावली आहे.

यामध्ये पूरग्रस्त सभासदांना 11 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दुसरीकडे संगमेश्‍वर, साडवली, आरवली, चिपळूण शहर, सती पिंपळी, खेर्डी, खेड, दस्तुरी पोलादपूर येथील आतापर्यंत एक हजार पूरग्रस्त सभासदांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून दिलासा दिला आहे. ही मदत घरपोच दिली जात आहे, हे विशेष. तसेच, जे सभासद शाखांमध्ये संपर्क करीत आहेत, त्यांना पण शाखा स्तरावर किट दिले जाणार आहे. मदत वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहेत.

Exit mobile version