अजित पवार गटाला ‘सर्वोच्च’ दणका

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडीओ न वापरण्याचे परिपत्रक काढा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अजित पवार गटाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांचे फोटो, व्हिडीओ यांचा वापर होत असल्याचे दिसून आले होते. आमदार अमोल मिटकरी यांनीही शरद पवार यांचा एक व्हिडीओ आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आणि बुधवारी सुनावणीदरम्यान हा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अमोल मिटकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ दाखला दिला. अजित पवार गट शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ वापरत आहे. तसेच अजित पवार गटाचे घड्याळ चिन्ह गोठवले जावे आणि दुसरे चिन्ह त्यांना द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडीओ वापरू नका, असे निर्देश दिले.

शरद पवार हे स्वत: निवडणूक लढवत असून, जवळपास 36 जागांवर अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये लढत होत आहे. त्यामुळे कोण कुणाच्या बाजूने आणि कोण विरोधात हे लोकांना कळणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाने उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी एक इलेक्ट्रॉनिक पत्रक काढावे. त्यात शरद पवार यांचे जुने फोटो किंवा व्हिडीओही वापरु नये, असे स्पष्ट करावे. तसेच विधानसभेला स्वतंत्र पक्ष म्हणून लढावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

Exit mobile version