तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहताय

सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं!
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण,न्या.चंद्रचूड आणि न्या.नागेश्‍वर राव यांच्यासमोर झालेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहात आहात. आम्ही दिलेल्या निर्णयांना तुमच्या लेखी अजिबात किंमत का देत नाही? असा खरमरीत सवाल करत आता आमच्याकडे तीनच पर्याय शिल्लक राहिले आहेत,अशा शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

न्यायालयांप्रमाणेच देशभरात विविध प्रकारच्या व्यावसायिक, पर्यावरण विषयक अशा वादांवर तोडगा काढण्यासाठी लवादांची देखील स्थापना करण्यात आली आहे.मात्र, गेल्या काही काळापासून या लवादांमध्ये कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्गाच्याही अनेक जागा रिकाम्या आहेत. वारंवार सांगून देखील त्या जागा सरकारकडून भरल्या जात नसल्यामुळे अखेर न्यायालयाने सरकारला परखड शब्दांमध्ये खडसावलं आहे.यावेळी बोलताना न्यायालयाने प्रशासनाच्या कार्यवाहीवर तीव्र नापसंती व्यक्त केली.

न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार आत्तापर्यंत संबंधित लवादांवर नियुक्त्या का करण्यात आलेल्या नाहीत? अशा प्रकारे नियुक्त्या न करून तुम्ही या लवादांचं खच्चीकरण करत आहात. यापैकी अनेक लवाद हे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, असं देखील न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

न्यायालयाच्या निकालांचा अजिबात आदर ठेवला जात नाही. तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहात आहात. देशभरातील लवादांमध्ये तुम्ही किती लोकाची नेमणूक केली? तुम्ही म्हणताय, काही लोकांची नेमणूक झाली आहे. पण कुठे आहे ती नेमणूक?


एन. व्ही. रमण,सरन्यायाधीश
Exit mobile version