मुकेश अंबानींना ‘सर्वोच्च’ दणका!

रिलायन्स आणि फ्युचरला डील करण्यास रोखले
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल यांच्यात 24 हजार कोटींपेक्षा अधिकचा करार झाला होता. अ‍ॅमेझॉनने या करारावर आक्षेप घेत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात सिंगापूर लवादाने तक्रारदार अ‍ॅमेझॉनच्या बाजूने निकाल देत फ्युचर समूहाला रिलायन्सशी व्यवहार करण्यापासून रोखले होते. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सिंगापूर लवादाने ऑक्टोबरमध्ये दिलेला निकाल योग्य असल्याचे म्हटले आहे. या निकालाने रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या स्वप्नांना जबरदस्त धक्का बसला आहे.

मागील वर्षभरापासून रिलायन्स आणि अ‍ॅमेझॉन या दोन कंपन्यांमध्ये न्यायालयीन लढाई सुरु होती. लवादाने दिलेला अंतरिम निकाल जर कलम 17 (1) मध्ये बसत असल्यास तोच निकाल आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन अ‍ॅक्ट कलमी 17 (2) मध्ये लागू होतो असे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले.

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फ्यूचर समूहाचा किरकोळ व घाऊक व्यवसाय आणि रसद व गोदाम व्यवसाय 24,713 कोटींना खरेदी करण्याची घोषणा केली होती. या करारामुळे रिलायन्सला फ्युचर ग्रुपच्या 420 शहरांमध्ये पसरलेल्या 1800 पेक्षा जास्त स्टोअरमध्ये प्रवेश मिळाला असता. मात्र, त्यात फ्युचर समूहातील गुंतवणूकदार अ‍ॅमेझॉनने सिंगापूरमधील लवादामध्ये आव्हान दिले होते.

Exit mobile version