। पुणे । प्रतिनिधी ।
आधी कुणी थोडं जरी बोललं, तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं. पण गेल्या दहा महिन्यात मी घट्ट झाले. इतकं रडून झालं आहे की आता अश्रू येत नाही, असं महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. ही वैचारिक लढाई आहे की, वैयक्तिक माझ्यासाठी नाही. पण, ज्या गलिच्छ पद्धतीने आज राजकारण चाललं आहे, त्या घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात लढाई आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी पक्षाकडे फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं, यांना ते तिकीट कधीच नको होतं. तेव्हा जर साहेब म्हणाले अरे तू लढतोस का, तर संध्याकाळी घरी येऊन तोच नेता म्हणायचा, साहेब माझं चुकलं का? मला लोकसभेला का पाठवता? कधीही आजपर्यंत त्यांनी लोकसभेचं तिकीट किंवा मला इच्छा आहे, हे सांगितलं नव्हतं. सांगितलं असतं ना, अरे मांगा होता, तो दिल खोलके तुमको देते. जे प्रेमाने घेण्यात जी मजा आहे ना, ती ओरबाडून घेण्यात मजा नाही. पण ही लढाई वेगळी आहे. कारण ही लढाई वैचारिक आहे की, वैयक्तिक माझ्यासाठी नाही. पण, ज्या गलिच्छ पद्धतीने आज राजकारण चाललं आहे, त्या घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात लढाई आहे.
इतकं रडून झालंय, आता अश्रूही येत नाही आधी मी एवढी घट्ट नव्हते, पण दहा महिन्यात झाली आहे. एवढंस जरी बोललं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं, पण आता इतकं रडून झालं की, आता डोळ्यातून अश्रूही येत नाही आणि कुणासाठी रडायचं तुम्हाला जर कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राची जाणीव नसेल तर कशासाठी रडायचं, असा उद्वीग्न सवालही सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.