| जालना | प्रतिनिधी |
दडपशाही करून भाजपाने पक्ष फोडला आणि घरेदेखील फोडली, असा घणाघात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. अदृश्य शक्तीच्या बळावर संविधानाला बाजूला ठेवून निर्णय घेतले जात असून, हे दुर्दैवी असल्याचं खा. सुळे म्हणाल्या. जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरदेखील सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरले. मराठा, धनगर, लिंगायत समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणाची मागणी सातत्याने केली जात आहे. आताच्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता स्थापन करण्यापूर्वी छातीठोकपणे आरक्षण देण्याची भाषा केली होती. आज दहा वर्षे लोटली, कुणाला दिले आरक्षण, असा असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.