माजी आ. सुरेश लाड यांनी वाढवला संभ्रम

शरद पवार गटाच्या मेळाव्याला राहीले गैरहजर

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रसचा (शरद पवार गट) मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश लाड हे उपस्थित राहीले नाहीत. काही दिवसांपूर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे पक्के झाले होते, मात्र माशी कोठे शिंकली हे कळले नाही आणि त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला. आता लाड हे नक्की कोणती भूमिका घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाच्या निमित्ताने बनविण्यात आलेल्या बॅनरवर लाड यांचे फोटो प्रामुख्याने झळकले होते. त्यामुळे लाड हे या कार्यक्रमला हजर राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. गेले काही दिवस लाड हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी नरेश जोशी, रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश टोकरे आणि मावळ लोकसभा मतदारसंघ महिला निरीक्षक माधवी जोशी यांनी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमाला आखला. त्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते हे लाड यांना माहिती देण्यासाठी गेले होते. मात्र आपण ज्या पक्षात नाही, त्या पक्षाच्या कार्यक्रमाला कसा येऊ शकतो असे थेटपणे सांगितले होते. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सुरेश लाड हे मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत हे माहिती होते. मात्र, तरी देखील लाड यांचे फोटो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेश मेळाव्याच्या बॅनरवर दिसत होते.

लाड हे तीनवेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा जनाधार आजही असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांना माहिती आहे. लाड यांचा फोटो बॅनरवर असल्याने कर्जत तालुक्यात गेली काही दिवस लाड हे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी सुरु झालेली चर्चा थांबली होती. मात्र लाड यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यक्रमस्थळी फिरकलेच नाहीत. मेळावा सुरु झाल्यावर लाड पोहचतील असे बोलले जात होते, मात्र ते पोहचलेच नाहीत. मेळाव्यानंतर माजी आमदार सुरेश लाड यांच्याशी संपर्क साधला असता, आपण ज्या पक्षात नाहीत त्या पक्षाच्या मेळावायला जाण्याचा प्रश्न येत नव्हता. माझे फोटो बॅनरवर दिसल्यानंतर मी काहीही बोललो नाही, परंतु, आयोजकांपैकी एका नेत्याला त्याबद्दल स्पष्ट कल्पना दिली होती, अशी माहिती लाड यांनी दिली.

दरम्यान, सुरेश लाड यांची पुढील वाटचाल कशी असेल याबाबद्दल आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तेे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. याच महिन्यात राष्ट्रवादी काँगेस अजित पवार गटाचे नेते दोन दिवस कर्जत मुक्कामी असणार आहेत. पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Exit mobile version