सुरेश लाड पुन्हा मैदानात

शरद पवारांसमवेत राहण्याचा निर्धार

| नेरळ | प्रतिनिधी |

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय होणार हे आता स्पष्ट झाले आहे. माजी आमदार सुरेश लाड यांनी आता थेट राजकीय आखाड्यात उडी घेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्याचा घेतला आहे. त्यामुळे सुरेश लाड आणि दत्तात्रय मसुरकर या नेत्यांनी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी थेट पंगा घेतला आहे. अजितदादा पवार यांनी शिंदे फडणवीस यांच्या सरकार मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कर्जत मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गट हे उघडपणे वेगवेगळ्या वाटेने जाणार हे निश्‍चित झाले. त्यांनतर शरद पवार गटाने मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे तर अजित पवार यांनी मुंबईतील भुजबळ नॉलेज सिटी येथे शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी कर्जत मतदारसंघातील गट वेगवेगळ्या शक्तिप्रदर्शन मध्ये सहभागी झाले होते. त्यात माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, खालापूर तालुका अध्यक्ष नरेश मते, कर्जत शहर अध्यक्ष रणजित जैन असे अनेक पदाधिकारी आणि पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे उपस्थित होते. तर शरद पवार यांच्या स्वागताला खोपोली येथील मातब्बर नेते दत्तात्रय मसुरकर यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे येथे स्वागतासाठी गर्दी केली होती. तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव, कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे अशी मंडळी तसेच दोन्ही तालुक्यातील शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे त्या दिवशी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी स्पष्ट झाली होती.

त्यानंतर खरी लढाई आता सुरु झाली असून कर्जत आणि खालापूर या मतदारसंघात तीनवेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार सुरेश लाड यांनी आता थेट राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी खर्‍या अर्थाने तटकरे यांच्याशी पंगा घेतला आहे. 1992 मध्ये रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुनील तटकरे बनले आणि कर्जत पंचायत समिती मध्ये सभापती सुरेश लाड बनले. तेंव्हापासून रायगडाच्या राजकारणात हे दोन एस कौटुंबिक मित्र बनले आणि आता कट्टर विरोधक बनले आहेत. कर्जतमध्ये आल्यावर सुरेश लाड यांच्याकडे आल्याशिवाय कधीही न परतणारे सुनील तटकरे यांनी मागील काही महिन्यात तटकरे कर्जत येथे आले आणि लाडांची भेट न घेता निघून गेले आहेत.मागील महिन्यात विद्यार्थी गुणगौरव सोहळा जो सुरेश लाड यांनी 20 वर्षांपूर्वी सुरु केला. त्या कार्यक्रमाला सुनील तटकरे आल्याने सुरेश लाड यांनी दहिवली येथील आपल्या घरी बसून राहणे पसंद केले होते. त्यामुळे रायगडच्या राजकारणात दो हंसो का जोडा समजले जाणारे सुनील तटकरे आणि सुरेश लाड हे बिखरले आहेत हे स्पष्ट झाले आहे. सुरेश लाड यांनी आता शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय यामुळे पक्षाचे जुने कार्यकर्ते शरद पवार यांना बाळ देण्यासाठी सरसावले असल्याचे चित्र आहे. त्यात रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील हे अजित पवर गटाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या सोबत असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून नवीन जिल्हा अध्यक्ष नेमले जाणार आहेत. त्यात शरद पवार यांचे अनेक दशकांचे सहकारी म्हणून समजले जाणारे खोपोलीचे दत्ता मसुरकर हे देखील शरद पवार यांचे हात बळकट कारण्यासाठी पक्ष बांधणीसाठी उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सुरेश लाड, दत्तात्रय मसुरकर यांनी सुनील तटकरे यांच्याशी घेतलेला पंगा कितपत यशस्वी ठरणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version