गृहिणींचे बजेट कोलमडले
| उरण | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाची धामधूम संपताच नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीचे वेध लागले असताना बाजारातील वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. घरातील स्वयंपाकघरापासून ते सणासुदीच्या खरेदीपर्यंत लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे घरगुती अर्थकारण कोलमडले असून, सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत असल्याचे चित्र आहे.
बाजारात तांदूळ, गहू, डाळी आणि विविध कडधान्यांसह किराणा मालाच्या दरात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. अनेक वस्तूंच्या दरात किलोमागे 5 ते 20 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे ग्राहक सांगत आहेत. त्यामुळे महिन्याच्या पगारातून घरभाडे, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च, वीजबिल आणि इतर गरजा भागवल्यानंतर उरलेल्या रकमेत घरखर्चाचा ताळमेळ साधताना मध्यमवर्गीय कुटुंबांची अक्षरशः दमछाक होत आहे.
पूर्वी सुमारे 50 रुपयांपासून मिळणाऱ्या तांदळाच्या विविध प्रकारांचे दर आता 60 रुपयांच्या पुढे गेले आहेत. मध्यमवर्गीय ग्राहकांकडून खरेदी केला जाणारा चांगल्या प्रतीचा तांदूळ 70 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. सुमारे 40 रुपयांचा गहू आता 42 ते 47 रुपये किलोपर्यंत मिळत असल्याने त्याच्या दरातही वाढ झाली आहे. 130 रुपये किलो असलेली तूरडाळ आता 150 ते 160 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सवापूर्वी 46 ते 48 रुपये किलो असलेली साखर आता 55 रुपयांच्या पुढे विकली जात आहे. चणाडाळीचे दरही 90 ते 100 रुपयांवरून 100 ते 110 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. नामवंत कंपन्यांच्या गव्हाच्या पिठाच्या दरातही किलोमागे सुमारे 5 रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे सुमारे 10 रुपयांची वाढ झाल्याचे ग्राहक सांगतात. रवा, मैदा आणि बेसन यांच्या दरातही किलोमागे 5 ते 20 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
साखरेसोबत गुळाचे दरही वाढले आहेत. साबुदाणा, शेंगदाणे, मूगडाळ, उडीदडाळ, पोहे यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. आता नवरात्र, दसरा आणि दिवाळीचे सण तोंडावर असल्याने वेलची, चारोळी, खसखस, मनुका, काजू-बदाम यांसारख्या सणासुदीच्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे दरही वाढल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खरेदी वाढण्याची शक्यता असताना जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले आहे. उत्पन्न वाढण्याचा वेग कमी आणि खर्चाचा आलेख वाढता असल्याने ‘सण साजरे करायचे तरी कसे?’ असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे.
