उपजिल्हा रुग्णालयात बालकांवर शस्त्रक्रिया 

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय ओक यांच्या वैद्यकीय पथकाने 16 बालकांच्या व्याधींवर शस्त्रक्रिया केल्या असून आणखी दहा बालकांवर शस्त्रक्रियेचे नियोजन आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांअंतर्गत व्याधीग्रस्त बालकांचा शोध घेत या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.

रुग्णालय व्यवस्थपनाने 16 जून रोजी विशेष शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. गरजू पालकांनी विनाशुल्क शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हर्निया, हायड्रोसिल, फायनोसीर आणि शरीरातील गाठी अशा वेगवेगळया आजार असलेल्या बालकांसाठी उपजिल्हा रुग्णालय हे विशेष सुश्रूषा केंद्र बनले आहे.

जिल्ह्यात हर्निया व हायड्रोसील या आजारांचे प्रमाण मुलांमध्ये अधिक आहे. त्यामुळे पनवेल उपजिल्हा रुग्णालयाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांअंतर्गत आंगणवाडी व शाळांमध्ये वैद्यकीय तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. यासाठी पाच वैद्यकीय पथके केली असून ती व्याधीग्रस्त मुलांचा शोध घेत आहेत. या पथकांमार्फत वैद्यकीय तपासणीनंतर 16 मुलांवर गंभीर आजार असल्याचे निष्पन्न झाले होते. रुग्णालय व्यवस्थापनाने सायन रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. ओक यांच्याशी संपर्क करीत हा प्रकार सांगितला. डॉ. ओक यांनी पनवेल उप जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया व्यवस्थेची पाहणी करीत तयारी दर्शवली. मार्च महिन्यात डॉ. ओक व त्यांच्या पथकाने 16 गरजू मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन संकपाळ यांनी दिली.

Exit mobile version