सिटीस्कॅन आणि एमआरआयची व्यवस्था नाही
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल उपजिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले असले तरी याठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे. विशेष करून एमआरआय आणि सिटीस्कॅनची सोय नसल्याने रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर सोनोग्राफीसाठी तंत्रज्ञ या ठिकाणी नाही, त्यामुळेसुद्धा अडचणी निर्माण होतात. येथे आरोग्य विभागाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पनवेलमध्ये याअगोदर ग्रामीण रुग्णालय होते.
महानगरपालिकेच्या पाठीमागील मैदानाच्या बाजूला हे हॉस्पिटल होते. मात्र, ते मोडकळीस आल्याने बारा वर्षांपूर्वी कोळी वाड्यामध्ये हे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात आले. या रुग्णालयाला ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय’ असे नाव देण्यात आले. या ठिकाणी राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु, आजही या ठिकाणी वैद्यकीय चाचण्या होताना दिसत नाहीत. पनवेल उपजिल्हा रुग्णालयमध्ये एमआरआय आणि सिटीस्कॅनची सुविधा नाही. त्यामुळे अपघात आणि इतर रुग्णांची चाचणी करता येत नाही. त्यांना त्यासाठी खासगी रुग्णालयात किंवा अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागते. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये पनवेल येथे उपजिल्हा रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत उभी राहिली.
त्यामुळे येथे गोरगरीब गरजू रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. सर्वसामान्यांसाठी हे रुग्णालय खर्या अर्थाने संजीवनी ठरत आहे. एकंदरीतच, या परिसराची लोकवस्ती विचारात घेता डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय चाचण्यांकरिता यंत्रणांची आवश्यकता आहे. या ठिकाणी एमआरआय आणि सिटीस्कॅन करण्याची सोय आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.