व्हॉट्सअ‍ॅपची शरणागती

प्रायव्हसी पॉलिसी तूर्तास स्थगिती
दिल्ली हायकोर्टात दिली माहिती
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आम्ही गोपनियतेच्या मुद्द्यावरुन आमच्या यूजर्सवर कोणताही दबाव आणणार नाही, त्यासाठी केंद्र सरकारच्या नवीन डेटा प्रोटेक्शन बिलची वाट पाहू, अशी नरमाईची भूमिका व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीप्रसंगी घेतली. व्हॉट्सअ‍ॅपने तशा प्रकारचे एक प्रतिज्ञापत्रक न्यायालयात सादर केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने उच्च न्यायालयात सांगितले की, हे नवीन गोपनीयता धोरण न स्वीकारणार्‍या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याची मर्यादा नसणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्यासमोर नवीन धोरण न स्वीकारणार्‍या वापरकर्त्यांवर कोणतीही मर्यादा आणणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही आमची नवीन प्रायव्हसी पॉलिसी सध्या स्थगित करत आहोत. त्याचं आमच्या यूजर्सनी पालन करावं असं कोणतंही बंधन नाही. केंद्र सरकार जे नवीन डेटा प्रोटेक्शन बिल आणणार आहे, त्याची आम्ही वाट पाहू आणि त्यानंतर सरकारच्या नियमांनुसार त्यामध्ये बदल करु असं व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या गोपनियतेच्या नियमांवरुन देशात मोठा गोंधळ झाला होता. अनेकांनी त्यावर टीकाही केली होती. दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. व्हॉट्सअ‍ॅप या सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपनं मागील काही दिवसांपासून नवं गोपनीयता धोरण लागू करण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. यासाठी युझर्सना हे धोरण स्वीकारण्यासाठीचं आवाहनही करण्यात आलं. तसा मेसेजही अनेकांपर्यंत पोहोचला. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं धोरण न स्वीकारणार्‍यांचं अकाऊंट बंद होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं.

Exit mobile version