पालापाचोळयासह तीनशे रोपे आगीच्या भक्ष्यस्थानी
| अलिबाग | प्रतिनिधी |
पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या आक्षीमधील सुरूच्या बनात आज (दि.24) दुपारी अचानक आग लागली. आगीच्या भडकेत सुमारे एक एकर क्षेत्रातील पालापाचोळा व तीनशेहून अधिक झाडांची रोपे जळून खाक झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सामाजिक वनीकरण, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने ही आग तीन तासात आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, पेटत्या सिगारेटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
अलिबाग तालुक्यातील आक्षी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी कायमच पसंतीला उतरत आहे. समुद्रकिनारी असलेली सुरूची झाडे पर्यटकांना भूरळ घालत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. आक्षी समुद्रकिनाऱ्यालगत सुरूच्या झाडांची लागवड केली आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक या बनात आग लागली. जोराचा वारा व दुपारच्यावेळेला असलेले कडक ऊन यामुळे आगीने भडका घेतला होता. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या परीने ती आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यावर सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रसाद गायकवाड, उदय घाटवाड, मौलेश तायडे, महादेव नाईक, निलेश शिंदे, निलेश पवार, रोहीत शिंदे, जितेंद्र ठाकूर, अमोल घरत, शुभम थळे यांच्यासह आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्लोअर्स यंत्र व ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल तीन तासानंतर ही आग विझविण्यात यश आले. ही आग पेटत्या सिगारेटमुळे लागली असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला. तसेच, या आगीत झाडांचे नुकसान झाले नसून सुके गवत व पालापाचोळा जळून गेल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी सुरूच्या बनात अचानक आग लागली. या आगीत सुकलेल्या गवतासह तीनशेहून अधिक लहान झाडे जळाली. त्यामुळे या परीसराची खुप माेठी हानी झाली आहे. स्थानीक ग्रामस्थ, तरूण मंडळी व वनविभागाच्या मदतीने ही आग विझवली.
अभिजीत वाळंज, ग्रामस्थ