जिल्ह्यातील पाच हजार स्त्रोतांचे सर्वेक्षण

| रायगड | खास प्रतिनिधी |

पावसाळ्यात अशुध्द पाणी पुरवठ्यामुळे साथीचे रोग पसरून नागरिकांचे आरोग्य बिघडण्याच्या घटना घडतात. यासाठी नागरिकांनी शुद्ध पाणी मिळावे यासाठी संबंधीत विभाग खबरदारी घेत असतात. जिल्ह्यातील 5 हजार 879 पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार 23 ग्रामपंचायतींच्या परिसरामध्ये अस्वच्छता असल्याने तेथील जलस्रोत अशु्‌‍ध्द होऊ शकते त्यामुळे त्यांना यलो कार्ड देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये एकाही ग्रामपंचायतीला रेड कार्ड देण्यात आले नाही.

ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, अशुध्द पाण्यामुळे अतिसाराची लागण अथला साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राच्या अंतर्गत येणार्या गावांचे जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे पाणी नमुने जिल्ह्याच्या प्रयोग शाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येत असतात. 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 5 हजार 879 जलस्रोतांचे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यात 23 ग्रामपंचायतींना यलो कार्ड देण्यात आले आहे. जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये 2 हजार 583 नळपाणीपुरवठा योजना , 1 हजार 410 विहिरी आणि 1 हजार 886 कूपनलिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 812 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 789 ग्रामपंचायतींना पाण्याचे हिरवे कार्ड देण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याच्या जोखमीनुसार लाल, पिवळे, व हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना देण्यात येते. अनियमित पाणी शुद्धीकरण, पाणी स्रोतांचा परिसर अस्वच्छ असणे, नळ, व्हॉल्व्हगळती होणे, योग्य गुणवत्तेच्या टीसीएल पावडरचा पुरेशा प्रमाणात साठा नसणे, वर्षभरात जलजन्य साथ रोगाचा उद्रेक झाला असेल, तर अशा ग्रामपंचायतीला लाल कार्ड दिले जाते. वरील दोष आढळून न आल्यास हिरवे कार्ड, तर अस्वच्छता आढळून आल्यास पिवळे कार्ड देण्यात येते. सलग दोन वेळा लाल कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना हिरव्या कार्डात रूपांतर होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन अनुदान दिले जात नाही. तीव्र व मध्यम जोखीम असल्याने लाल व पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना स्रोतांबाबत एका महिन्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतात. अन्यथा ग्रामसेवकांची एक वेतनवाढ एका वर्षासाठी थांबविण्याबाबतचा नियम आहे.

ज्या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाणी पिण्या योग्य नाही अशा गावांच्या ग्रामपंचायतींना गावातील नादुरूस्त व्हाल्व दुरूस्त करणे, गावातील गळत्या रोखणे, ज्या भागातून जलवाहिनी गेली आहे त्या भागातील उकीरेडे उचलण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. तसेच जलकुंभामध्ये लम, तुरटी टाकून पाणी शुध्द देण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आल्याचे पाणी व स्वच्छता विभागाने स्पष्ट केले.

कोणत्या ग्रामपंचायतीला यलो कार्ड
जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींमध्ये सध्या अशुध्द पाणी पुरवठा होत आहे. यात सर्वाधिक 8 ग्रामपंचायती रोहा तालुक्यातील आहेत. यात येरळ, चिंचवली तर्फे दिवाळी, कुडली, कोलाड, जामगाव, पळस, नागोठणे आणि कोंडगाव यांचा समावेश आहे. पनवेल तालुक्यात वलप, वावंजे, पाले, कानपोली, चिंध्रण, खैरणे आणि नितलास, पेण तालुक्यातील वरवने, दादर, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन आणि उरण तालुक्यातील चिरनेर, चिर्ले, आवरे, चाणजे आणि कोप्रोली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Exit mobile version